भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नजर आहे. मिस्बाह-उल-हकच्या जागी कर्स्टन यांना पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कायमस्वरूपी प्रशिक्षक बनवायचे आहे. याशिवाय सायमन कॅटिच आणि पीटर मूर्स हेही प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आहेत. २०२१ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता.
दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर सायमन कॅटिचने कोलकाता नाइट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय, आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यापर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. पीटर मूर्स हे दोन वेळा इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. मूर्स यांनी नॉटिंगहॅमशायरसोबत नुकताच तीन वर्षांचा करार केला. मूर्स हे दोन वेगवेगळ्या संघांसह काउंटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणाऱ्या प्रशिक्षकांपैकी एक आहेत.
टी-२० विश्वचषकापूर्वी मिसबाह आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी पाकिस्तानी संघापासून फारकत घेतली होती. पीसीबीने माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकची वर्ल्डकपसाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. रमीझ राजा यांनी पीसीबी प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्याने पाकिस्तानी क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रमीझ राजा पूर्णवेळ विदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या बाजूने आहेत.
हेही वाचा – T20 WC: “…तर मी ते आनंदाने करेन”, क्विंटन डी कॉकचा माफीनामा; आता गुडघ्यावर बसण्यास तयार
मात्र, मिसबाह आणि वकार यांच्या राजीनाम्याचा टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील एकतर्फी लढतीत पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर रोमहर्षक सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा ५ विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या गटात पाकिस्तानचा संघ दोन सामने जिंकून अव्वल स्थानावर असून त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे.