Gautam Gambhir on Rohit Sharma Captaincy:  कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा आतापर्यंतचा प्रवास चांगला दिसत आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून चारही सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी श्रीलंकेवर २-० असा विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही २-० अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून रोहितने दोन्ही सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे, मात्र असे असतानाही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ‘हिटमॅन’च्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “विराट कोहलीने जेव्हाही या कसोटी संघाचे नेतृत्व केले तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली आहे, परंतु रोहित शर्मा त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे. खरे सांगायचे तर, रोहित शर्माने स्वतःचा कोणताही संघ बनवला नाही. विराट कोहली ज्या प्रकारे अश्विन आणि जडेजाला मॅनेज करत होता, रोहित शर्माही तेच करत आहे. कोणतेही नवीन खेळाडू त्याने तयार केले नाही.”

हेही वाचा: IND vs AUS: live सामन्यात कार्तिक-मार्क वॉ भिडले! पुजाराबद्दल झाली जोरदार चर्चा, मांजरेकर होते टेन्शनमध्ये

गंभीर पुढे म्हणाला की, रोहित शर्माचे खरे आव्हान आशियाबाहेर असणार आहे. त्याने ही टीम बनवण्याचे श्रेय विराटला दिले आणि रोहित जे काही करत आहे त्यात त्याला फारसा फरक दिसत नाही असा दावा केला. माजी सलामीवीर म्हणाला, “रोहित शर्मासमोर खरे आव्हान असेल जेव्हा तो ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला जाईल कारण विराट कोहलीसमोर मोठी आव्हाने होती. विराट कोहलीने हा संघ बनवला आहे ज्यात त्याने मोहम्मद शमी, सिराज, जसप्रीत बुमराह, अश्विन, जडेजा, अक्षर यांसारखे खेळाडू तयार केले.”

तो पुढे म्हणाला, “विराट कोहलीही तितकाच यशस्वी ठरला. म्हणूनच मला फारसा फरक दिसत नाही आणि या परिस्थितीत कोण चांगला कर्णधार आहे हे मला सांगायचेही नाही, कारण रोहित आता जितका चांगला कर्णधार आहे तितकाच विराटही होता. रोहितचे आव्हान परदेशात असेल.”

हेही वाचा: PSL: पाकिस्तान सुपर लीग वादाच्या भोवऱ्यात; तीन फ्रँचायझींची सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांशी हातमिळवणी, PCBवर प्रश्नचिन्ह

सामन्यात काय झाले?

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदीरत विचार केला तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारताने त्यांच्या पहिल्या डावात २६२ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियान संघ अवघ्या ११३ धावांवर गुंडाळला गेला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीन, तर रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताला विजयासाठी ११५ धावाचे लक्ष्य मिळाले, हे ४ विकेट्सच्या नुकसानावर भारतीय संघाने गाठले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir a real team is built by virat rohit only takes it forward gautam gambhirs big statement on the captaincy of hitman avw