ICC Champions Trophy Gautam Gambhir : चॅम्पियन्स करंडक २०२५ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ९ मार्च रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आज (६ मार्च) या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना खेळवला जात असून न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरीत भारताविरोधात मैदानात उतरेल. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन ही स्पर्धा खेळण्यास नकार दिल्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. भारताने या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट मिळवल्याने आता हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर, इतर सर्व संघ पाकिस्तानमधील विविधी स्टेडियमवर आपापले सामने खेळत असून भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांना दुबईला जावं लागत आहे. यामुळे भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांचे माजी खेळाडू, क्रिकेट समालोचक, क्रिकेट समीक्षक स्पर्धेच्या आयोजनावर आक्षेप नोंदवत आहेत.

दुसऱ्या बाजूला काही पाकिस्तानी क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटूंनी दावा केला आहे की भारतीय संघ दुबईच्या मैदानावर सगळे सामने खेळतोय, त्याचा त्यांना फायदा होत आहे. म्हणूनच ते या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गंभीरने सडेतोड उत्तर दिलं.

हे मैदान आमच्यासाठी देखील नवीनच : गंभीर

गौतम गंभीर म्हणाला, “भारतीय संघ दुबईच्या मैदानावर खेळतोय म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारचा वेगळा फायदा होत नाहीये. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आमचा संघ इथे आल्यानंतर आम्हाला या मैदानावर सराव करण्याची संधी देखील मिळाली नाही. मला कल्पना आहे की काहीजण वादविवाद करत आहेत की आम्हाला दुबईत खेळण्याचा फायदा होतोय. परंतु, मला कळत नाही की आम्हाला नेमका कसला फायदा होतोय? हे काही आमचं घरचं मैदान नाही. हे एक तटस्थ ठिकाण आहे. स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानपासून जवळ आहे. इतर संघांसाठी हे मैदान जितकं नवीन आहे तितकंच ते आमच्यासाठी देखील आहे. मला तर आठवत देखील नाही की भारतीय संघ या मैदानावर शेवटची कोणती स्पर्धा खेळला होता.”

“परिस्थिती पाहून आम्ही चार फिरकीपटू मैदानात उतरवले”

आम्ही या मैदानावर एकही दिवस सराव केलेला नाही. आम्ही आयसीसीच्या क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन सराव करतोय. इथल्या आणि तिथल्या परिस्थितीत १८० अंशांचा फरक आहे. काही लोकांना केवळ तक्रारीच करायच्या असतात. मला नाही वाटत की दुबईच्या मैदानावर खेळल्याचा आमच्या संघाला काही फायदा होत असेल. आम्ही केवळ एकच गोष्ट केली आहे की इथल्या खेळपट्टीविषयची माहिती घेऊन या मैदानावर चार फिरकीपटू उतरवले. तसेच भारतीय उपखंडतील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल असतात. त्यामुळे इथल्या खेळपट्ट्यांवर खेळताना कोणताही संघ किमान दोन फिरकीपटूंना घेऊनच मैदानात उतरतो. तसेच आमच्याविरोधात खेळणाऱ्या संघांनी देखील दोन-दोन, तीन-तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते.

Story img Loader