Gautam Gambhir on Varun Chakravarthy replace Yashasvi Jaiswal in Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्याबाबत आपले मौन सोडले आहे. यशस्वीच्या जागी वरुणला संघात का समाविष्ट करण्यात आले आहे, हे गंभीरने सांगितले आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी भारताने अलीकडेच आपल्या १५ सदस्यीय संघात दोन बदल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुखापतग्रस्त जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची जागा हर्षित राणाला घेण्यात आली, तर यशस्वीची जागा वरुणने घेतली. वरुणच्या संघातील समावेशामुळे काही क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहते आश्चर्यचकित झाले. या स्पर्धेसाठी संघात समावेश झालेला वरुण हा पाचवा फिरकी गोलंदाज आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे आधीच संघात होते. गंभीर म्हणाला की, वरुण मधल्या षटकांमध्ये विकेट घेऊ शकतो, म्हणून आम्ही संघात दुसऱ्या फिरकी गोलंदाजाला स्थान दिले आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला?

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला, “वरुणला संघात घेण्याचे एकमेव कारण म्हणजे आम्हाला आणखी एक गोलंदाज हवा होता, जो मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेऊ शकेल. वरुण काय करण्यास सक्षम आहे, हे आम्हाला माहिती आहे आणि त्याच्याविरुद्ध कधीही न खेळलेल्या अनेक संघांसाठी तो धोका ठरू शकतो. तो एक्स फॅक्टर असल्याचे सिद्ध होऊ शकतो.”

नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जैस्वालला एकदिवसीय पदार्पणाची संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात यशस्वीने २२ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. यानंतर विराट कोहली संघात परतल्याने यशस्वीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले, तर वरुणने या सामन्यातून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, वरुणने १० षटकांच्या स्पेलमध्ये ५४ धावा देऊन एक विकेट घेतली होती.