ICC World Cup 2023: १४ ऑक्टोबर रोजी भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यापासून कर्णधार बाबर आझम सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्लेषक त्याच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, बाबर आझमला काही दिग्गज खेळाडू सल्लाही देत आहेत. या यादीत टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने बाबर आझमला २०२३चा विश्वचषक जिंकण्याचा सल्ला दिला आहे. बाबर आझम याने आपली रणनीती बदलण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले आहे. तो म्हणतो की, “संघासाठी आकडेवारी नाही तर विजय महत्त्वाचा असतो.”
गौतम गंभीरने बाबर आझमला दिला सल्ला
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “बाबर आझमने आता वर्ल्ड कप २०२३मध्ये स्वतःवर अधिक जबाबदारी घेतली पाहिजे.” बाबर आझमने आपली रणनीती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांचे मत आहे. माजी खेळाडू म्हणाला, “बाबरला त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा खेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पाकिस्तानला आक्रमक फलंदाजांचा इतिहास आहे. यामध्ये शाहिद आफ्रिदी, इम्रान नझीर, सईद अन्वर आणि आमिर सोहेल यांचा समावेश आहे. सध्या आघाडीचे तीन फलंदाज एकाच शैलीत फलंदाजी करत आहेत. इथे कोणाला जबाबदारी घ्यायची असेल तर ती तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कर्णधाराला घ्यावी लागेल.”
बाबर आझमच्या कर्णधारपदाबाबत केले मोठे विधान
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, “संघाच्या आकडेवारीने काही फरक पडत नाही. त्यामुळे संघासाठी विजयाची नोंद करणे अधिक महत्त्वाचे आहे.” गौतम गंभीर म्हणाला, “मोठ्या स्पर्धा जिंकून वारशाचा पाया रचला जातो. आकडे बघण्यात अर्थ नाही. तुम्ही पाकिस्तानचे किती धावा केल्या याला फारसे महत्व नाही. तुम्ही सर्वाधिक धावा करणारे खेळाडू असाल, पण तुमच्या वारशाचा पाया मोठ्या स्पर्धा जिंकून होतो. हे वैयक्तिक विक्रम बनले तरी फारसे महत्वाचे नसतात.”
पुढे गंभीर म्हणाला की, “वसीम अक्रमने १९९२च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याने फलंदाजी केली नाही, परंतु पाकिस्तानने विश्वचषक जिंकल्यामुळे सर्वजण याबद्दल बोलतात. २०११च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये महेला जयवर्धनेच्या शतकाबद्दल कोणीही बोलत नाही. भारताने सामना जिंकला हे सर्वांच्या लक्षात आहे.”
१४ ऑक्टोबर रोजी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा एक मोठा सामना खेळला गेला. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी खूपच निराशाजनक होती. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ ४२.५ षटकांत १९१ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ३०.३ षटकांत १९२ धावा केल्या आणि ७ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.