Gautam Gambhir Talks on Pitches in Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळपट्टीबाबत बरीच चर्चा होत आहे. मात्र, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला याची अजिबात चिंता नाही. सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया कोणत्याही विशिष्ट प्रकारची खेळपट्टी तयार करणार नाही, असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर टीम इंडिया कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीर काय म्हणाला?

गौतम गंभीर म्हणाला, ‘ते कोणत्या प्रकारची विकेट तयार करतात यावर आमचे नियंत्रण नाही. ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर किंवा कोणत्याही परिस्थितीत खेळण्यास तयार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय संघ जर आपल्या क्षमतेनुसार खेळला, तर तो कोणत्याही संघाला कोणत्याही खेळपट्टीवर पराभूत करू शकतो.’ सध्या अशी अटकळ आहे की भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी तयार केली जाणार आहे.

कसोटी मालिकेपूर्वी खेळपट्टीबाबत चर्चा तीव्र –

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, मेलबर्न, ॲडलेड आणि पर्थच्या मैदानावर अत्यंत कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले. पाकिस्तानने ही मालिका २-१ ने जिंकली. मेलबर्न, ॲडलेड आणि पर्थ येथे झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १२.०० च्या प्राणघातक गोलंदाजीच्या सरासरीने सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या. तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या २०४ धावांची होती. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पाहायला मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा – Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

u

भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करण्यास उत्सुक –

याशिवाय गौतम गंभीर म्हणाला की, मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिका ३-० ने गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्यासाठी जिद्द बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गौतम गंभीर म्हणाला, ‘भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चांगली कामगिरी करण्याची अदम्य इच्छा असणे, माझ्यासाठी आणि सर्व खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषत: शेवटच्या मालिकेचे निकाल पाहिल्यानंतर.’ विराट कोहली आणि रोहित शर्माचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे का, असे गंभीरला विचारले असता तो म्हणाला, ‘अजिबात नाही. ते खूप कणखर खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप यश संपादन केले आहे आणि भविष्यातही खूप यश मिळवतील. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांच्यात अजूनही आवड आहे. त्यांना अजूनही खूप काही साध्य करायचे आहे आणि हे खूप महत्वाचे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir has challenged australia to prepare any kind of wickets ahead border gavaskar trophy vbm