Manoj Tiwary criticism of Gautam Gambhir : माजी फलंदाज मनोज तिवारीने भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत गौतम गंभीरच्या प्रशिक्षक शैलीवर जोरदार टीका केली. गंभीरच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघाने २७ वर्षात प्रथमच श्रीलंकेत वनडे मालिका गमावली. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच १० वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला.
गौतम एक गंभीर ढोंगी –
न्यूज18 बांग्लाशी बोलताना मनोज तिवारी म्हणाला की, ‘गौतम एक गंभीर ढोंगी आहे. तो जे बोलतो ते करत नाही. कर्णधार (रोहित) कुठला आहे? मुंबईचा आहे. अभिषेक नायर कुठून आहे? मुंबईचा आहे. त्याला मुंबईचे खेळाडू पुढे ठेवण्याची संधी मिळाली आहे. जलज सक्सेनासाठी बोलणारे कोणी नाही. तो चांगली कामगिरी करतो, पण शांत राहतो. आता हा मॉर्ने मॉर्केल लखनौ सुपर जायंट्सकडून आला आहे. अभिषेक नायर केकेआरमध्ये गंभीरसोबत होता. हे लोक गौतम गंभीरसाठी सोयीस्कर आहेत. हे सर्व गंभीर सांगेल त्याप्रमाणे वागणारे लोक आहे. म्हणूनच त्यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.’
‘गंभीरऐवजी बहुतुले किंवा लक्ष्मण प्रशिक्षक असायला हवे होते’ –
२०१३ मध्ये आयपीएल खेळताना मनोज तिवारीचा ड्रेसिंग रूममध्ये गंभीरसोबत वाद झाला होता. त्यावेळी दोघे कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळत होते. तिवारीच्या मते व्हीव्हीएस लक्ष्मण आणि साईराज बहुतुले यांसारख्या माजी खेळाडूंना कोचिंगचा पुरेसा अनुभव आहे आणि ते भारतीय संघाचे प्रशिक्षक करण्यासाठी आदर्श पर्याय ठरले असते. तो म्हणाला, ‘मला वाटतं व्हीव्हीएस लक्ष्मण आणि साईराज बहुतुले यांसारखे माजी खेळाडू पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी रांगेत होते. हे लोक गेल्या अनेक वर्षांपासून एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) सोबत आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यासारखा कोणीतरी पुढचा प्रशिक्षक व्हायला हवा होता.’
‘अनुभवहीन व्यक्ती आल्यावर असे घडते’ –
मनोज तिवारी पुढे म्हणाला, गौतम गंभीरला संघाला विजयाच्या मार्गावर परत आणण्यासाठी बराच वेळ लागेल. त्याला भारतासारख्या संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा अनुभव नाही. जेव्हा अनुभव नसलेला व्यक्ती काम करण्यासाठी येतो, तेव्हा तो किती आक्रमक आहे याने फरक पडत नाही. अशा स्थितीत हा निकाल येणे निश्चित आहे. मुळात आयपीएलचा निकाल पाहूनच मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय चुकीचा होता. माझ्या मते हा योग्य पर्याय नव्हता.’
केकेआरला चॅम्पियन बनवण्याचे फक्त श्रेय गौतमला का मिळते?
केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवण्याचे संपूर्ण श्रेय गंभीरला दिल्याबद्दल मनोज तिवारीने टीका केली. त्याने संघाच्या यशात मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि खेळाडूंचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘गंभीरने आंद्रे रसेल आणि सुनील नरेनसारख्या खेळाडूंचे मनोबल वाढवले यात शंका नाही, जे वाईट टप्प्यातून जात होते. पण जर तो सर्व काम करत होता, तर चंद्रकांत पंडित काय करत होते? केकेआरच्या यशात प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडित आणि इतर खेळाडूंची भूमिका नव्हती, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?