भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं ९६ धावांचं आव्हान करताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. ६ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारत सामना गमावतो की काय असं वाटत असताना, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मात्र त्याआधी गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. नवोदीत नवदीप सैनीने विंडीजच्या ३ फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला.

सैनीच्या या कामगिरीमुळे खुश झालेल्या गौतम गंभीरने, ट्विटरवर त्याचं अभिनंदन करताना, माजी खेळाडू बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांना खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाला गौतम गंभीर?

चांगल्या कामगिरीबद्दल नवदीप तुझं अभिनंदन, मात्र गोलंदाजीआधीच तू दोन महत्वाच्या विकेट घेतल्या आहेस. बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प तू उडवला आहेस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच तुझी कारकीर्द संपवू पाहणाऱ्या लोकांची तू विकेट घेतली आहेस.

काय आहे नेमका वाद?

नवदीप सैनी आणि नितीश राणा या दोन खेळाडूंना गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदी असताना खूप मदत केली होती. मात्र बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहन यांनी या दोन्ही खेळाडूंची दिल्लीच्या संघात निवड करण्यासाठी नकार दिला होता. मात्र गौतम गंभीरने दोघांमधली गुणवत्ता हेरली होती. गौतमने निवड समितीसमोर, नवदीप-नितीशची संघात निवड झाली नाही तर मी कर्णधारपद सोडेन अशी धमकी दिली. यानंतर दोन्ही खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावत आपली छाप पाडली.

Story img Loader