Gautam Gambhir returns to KKR as Mentor: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असेल. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. गंभीरने लखनऊ संघाचे मार्गदर्शक पद सोडले आहे. आयपीएल २०२३ संपल्यानंतर गौतम गंभीरने शाहरुख खानची भेट घेतली, ज्यानंतर तो त्या आयपीएल संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ सुरू झाली होती. ज्याला त्याने स्वतः एकेकाळी त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल चॅम्पियन बनवले होते. केकेआर सीईओ वेंकी म्हैसूर यांनी आज (बुधवार, २२ नोव्हेंबर) जाहीर केले की माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर केकेआर मध्ये “मार्गदर्शक” म्हणून परत येईल आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याबरोबर काम करेल. लखनऊ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक पद सोडल्यानंतर गौतम गंभीरनेही एक भावनिक संदेश शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हे पद सोडताना खूप भावूक दिसत होता.
आयपीएलच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल २०२४ पूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आधीच संघ सोडला होता. आता मार्गदर्शक गौतम गंभीरनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वतः गंभीरने ट्विटरवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा नवा मार्गदर्शक बनला आहे. केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत, तर कर्णधार श्रेयस अय्यर आहे.
लखनऊचे मार्गदर्शक पद सोडणार अशी आधीच माहिती आली होती
फ्लॉवर प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यापासून गंभीरही लखनऊ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. के.एल. राहुलबरोबरचा त्याचा कार्यकाळ शानदार राहिला असून, त्याचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, दोन्ही वेळा तो प्लेऑफमधून बाहेर पडला आणि अंतिम फेरी गाठू शकला नाही. अँडी फ्लॉवरच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गंभीरने त्याच्या पोस्टमध्ये काय लिहिले?
गंभीरने बुधवारी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “एलएसजी ब्रिगेड!” याबरोबर त्याने दोन हार्ट इमोजी जोडले. गंभीरने पुढे लिहिले की, “लखनऊ सुपर जायंट्सबरोबरचा माझा अप्रतिम प्रवास संपल्याची घोषणा करत आहे. या क्षणी, मी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि ज्यांनी हा प्रवास संस्मरणीय बनवला आहे, त्या सर्वांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मी डॉ. संजीव गोयंका यांचे मन जिंकण्यात यशस्वी झालो, याबद्दल मी खूप समाधानी आहे. त्यांनी माझ्याप्रती निर्माण विश्वास आणि उत्कृष्ट नेतृत्व सोपवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. मला खात्री आहे की हा संघ भविष्यात उत्तम कामगिरी दाखवेल आणि लखनऊच्या सर्व चाहत्यांना अभिमान वाटेल. एलएसजी ब्रिगेडला खूप खूप शुभेच्छा.”
केकेआरमध्ये परतल्यावर गंभीर काय म्हणाला?
गंभीरने यापूर्वी केकेआरबरोबर काम केले आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. गंभीर २०११ ते २०१७ पर्यंत केकेआरचा कर्णधार होता आणि आता तो या संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करेन. केकेआरमध्ये परतल्यावर गंभीर म्हणाला, “मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, पण ही गोष्ट वेगळी आहे. मी परत आलो आहे जिथून हे सर्व सुरू झाले होते. आता जेव्हा मी पुन्हा एकदा जांभळ्या आणि सोनेरी रंगाची जर्सी घालण्याचा विचार करतो तेव्हा खूप भावनिक होतो. मी केवळ केकेआरमध्येच परतत नाही तर सिटी ऑफ जॉयमध्ये परत येत आहे. मी परत आलो कारण, मला विजयाची भूक आहे. मी २३ क्रमांकाचा खेळाडू आहे.”
शाहरुख खानने गंभीरबाबत केले मोठे विधान
केकेआरमध्ये गंभीरचे स्वागत करताना, संघाचा सह-मालक शाहरुख खान म्हणाला, “गौतम नेहमीच कुटुंबाचा एक भाग होता आणि सदैव राहील. आता आमचा कर्णधार एका वेगळ्या अवतारात एक मार्गदर्शक म्हणून संघात परतत आहे. त्याची उणीव सर्वांना जाणवली, तो येत असल्याने आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. आम्हाला चंदू सर (चंद्रकांत पंडित), गौतम यांना टीम केकेआरला पुढे नेताना आणि संघात कधीही न मरणारा आत्मा आणि खिलाडूवृत्ती वाढवताना बघायचे आहे.”