भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि बंगाली समाजाला उद्देशून गौतम गंभीरने आक्षेपार्ह उद्गार काढले असा आरोप बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने केला. रणजी क्रिकेट स्पर्धेच्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील लढतीदरम्यान गंभीर आणि तिवारी यांच्यात बाचाबाची झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर तिवारी बोलत होता.
सामना संपल्यानंतर तिवारीने सामनाधिकारी वाल्मिक बूच यांची भेट घेतली. या प्रकरणासंदर्भात गांगुलीशी चर्चा केल्याचेही तिवारीने सांगितले. झालेल्या प्रकाराबद्दल गांगुलीने नाराजी व्यक्त केली.
‘गांगुली आणि बंगाली समाजाबद्दल त्याने आक्षेपार्ह उद्गार काढले. गांगुली आणि मी बंगाली समाजाचे प्रतिनिधित्त्व करतो. या समाजाविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह उद्गार आम्ही सहन करु शकत नाही. कोणत्याही समाजाविरुद्ध असे उद्गार काढणे योग्य नाही. क्रिकेटमध्ये शेरेबाजी चालते. मात्र त्याला विशिष्ट मर्यादा असते. आपल्या समाजाविरुद्ध अशा गोष्टी ऐकताना त्रास होतो’, असे तिवारीने सांगितले. प्रतिस्पध्र्याविरुद्ध दबाव तंत्राचा उपयोग करण्यात वावगे काहीच नाही मात्र वैयक्तिक टिप्पणी कधीही करता कामा नये असे त्याने पुढे सांगितले.
त्या प्रसंगाचे चित्रण उपलब्ध आहे. सामनाधिकारी या व्हिडिओचे पाहणी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. याप्रसंगासंदर्भातील अहवाल बीसीसीआयकडे पाठवण्यात येणार आहे’.
गंभीरने तिवारीचे आरोप फेटाळले
मनोज तिवारीने माझ्यावरील केलेले आरोप कपोकल्पित असून, त्यात काहीही तथ्य नाही असे गौतम गंभीरने सांगितले. सौरव गांगुली आणि बंगाली समाजाबद्दल मी आक्षेपार्ह उद्गार काढले असा आरोप तिवारीने केला. या आरोपांसह त्याने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. गांगुली हा माझा भारताचा सवरेत्कृष्ट कर्णधार आहे. त्याला मी दादा म्हणतो. त्यामुळे तिवारीच्या आरोपांत काहीही तथ्य नाही आणि सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. तो पुढे म्हणाला, ‘मी भारतीय असल्याचा अभिमान आहे. सर्व धर्म, प्रांत, भाषा यांचा मी आदर करतो. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्त्व करताना मी बंगाली जनतेचे प्रेम अनुभवले आहे. बंगाल हे माझे दुसरे घर आहे. आणि बंगाली चाहत्यांचे प्रेम कोलकाताच्या विजयात निर्णायक आहे. गांगुलीचा मी कधीही अनादर करू शकत नाही. भारतीय क्रिकेटला त्याने दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्याच्याकडून मी असंख्य गोष्टी शिकलो आहे’.