टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. दुसरीकडे क्रिकेटपटूंनी देखील नीरजला शुभेच्छा दिल्या. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह यांनी विजय क्रिकेट विश्वचषक २०११ पेक्षा मोठा असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने हा व्हिडिओ रिट्वीट करत “असं बोलयला नको होतं”, असं पोस्ट लिहिली आहे. गौतम गंभीरने ही पोस्ट गंमतीशीर शैलीत लिहिली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षानंतर कांस्य पदक पटकावल्यानंतर गौतम गंभीरनेही असंच एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. त्याच्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

क्रिकेटपटू हरभजन सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजचं कौतुक केलं. “हे सुवर्ण पदक २०११ विश्वचषकाहून मोठा विजय आहे. २०११ विश्वचषकाच्या तुलनेत याचा आनंद ५० टक्के अधिक साजरा केला पाहीजे”, असं मत हरभजन सिंह याने नोंदवलं होतं. हरभजनच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ गौतम गंभीरने  रिट्वीट करत स्माइलीसह पोस्ट लिहिली आहे. “खरं आहे हरभजन सिंह…पण तू असं बोलायला नको होतं! तू असं असं बोलायला नको होतं! तू असं बोलायला नको होतं!”, असं ट्वीट गौतम गंभीरने केलं आहे.

“१९८३, २००७ आणि २०११ विसरून जा. हॉकीतील हे पदक विश्वचषकापेक्षा मोठं आहे”, असं ट्वीट गौतम गंभीर याने केलं होतं. त्यानंतर ट्रोलर्सने त्याला धारेवर धरलं होतं.

तब्बल १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पी. व्ही. सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला होता.

Story img Loader