विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेटचाहत्यांचं स्वप्नही धुळीस मिळालं. मात्र, या पराभवानंतर आता त्याचं विश्लेषण आणि कारणमीमांसा केली जात आहे. रोहित शर्मा व विराट कोहली टी २०मधून निवृत्ती घेणार असल्यापर्यंत ही चर्चा पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या कामगिरीचं विश्लेषण करणाऱ्यांमध्ये माजी सलामीवीर गौतम गंभीरचाही समावेश आहे. यासंदर्भात भाष्य करताना गौतम गंभीरनं कर्णधार रोहित शर्माच्या एका विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवला जावा, अशीही इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.
“..मग त्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही”
गौतम गंभीरच्या या विधानासंदर्भात एनडीटीव्ही इंडियानं स्पोर्ट्सकीडाच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. “ज्या प्रकारे भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात खेळलाय, ते पाहाता राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ दिली जायला हवी. जर तुम्ही एका प्रशिक्षकाला एका सामन्यातील पराभवावर जोखणार असाल, तर ते चुकीचं ठरेल. जी बाब खेळाडूंची, तीच बाब प्रशिक्षकालाही लागू होते. प्रत्येक खेळाडू किंवा प्रशिक्षकाला संघासाठी विश्वचषक जिंकण्याचीच इच्छा असते. त्यामुळे जर द्रविडला प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवायचा असेल, तर तसं करण्याशिवाय दुसरा कुठला चांगला पर्याय असू शकत नाही”, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
रोहित शर्माच्या विधानावर नाराजी!
कर्णधार रोहित शर्मानं विश्वचषक अंतिम सामन्याच्या आधी पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानावर गौतम गंभीरनं आक्षेप नोंदवला आहे. “टी २० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आम्हाला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी राहुल द्रविड कठीण काळात खेळाडूंसोबत ठामपणे उभा राहिला. त्यानं दिलेल्या पाठिंब्याची सर्वच खेळाडूंना मदत झाली. त्यामुळे विश्वचषक अंतिम सामन्यासारख्या मोठ्या क्षणाचा साक्षीदार होण्याची त्याची इच्छा होती. आम्हाला हा विश्वचषक त्याच्यासाठी जिंकायचा आहे”, असं रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला होता.
“असं विधान करणं चुकीचं आहे”
दरम्यान, गौतम गंभीरनं रोहित शर्माच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “मला एक गोष्ट कळत नाही. हेच २०११ सालीही घडलं. कुठल्यातरी एका व्यक्तीसाठी विश्वचषक जिंकायचा असं विधान करणं चुकीचं आहे”, असं गौतम गंभीर म्हणाला. “तुम्ही संपूर्ण देशासाठी विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करत आहात. आणि जर तुम्हाला असं काही म्हणायचंच असेल, तर तुम्ही ते माध्यमांसमोर म्हणू नका. तुमचं ते मत तुमच्यापर्यंतच ठेवा. तुम्ही देशासाठी विश्वचषक जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे”, असंही गंभीरनं नमूद केलं.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माची पहिली सोशल मीडिया पोस्ट; ‘हा’ फोटो केला शेअर!
“२०११ मध्ये जेव्हा सगळे हे म्हणत होते की आम्ही एका व्यक्तीसाठी विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा मलाही हाच प्रश्न विचारण्यात आला होता. मी तेव्हा म्हणालो होतो अजिबात नाही. मला माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. मी माझ्या देशासाठी माझी बॅट हातात घेतली होती. त्यामुळे कदाचित रोहित शर्मानं असं विधान करायला नको होतं”, अशा शब्दांत गौतम गंभीरनं आपली नाराजी बोलून दाखवली आहे.