भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण केलं. भारताला २००७ साली झालेला टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ चा विश्वचषक भारताला जिंकवून देण्यात गौतम गंभीरचा महत्वाचा वाटा होता. मात्र गेले काही महिने गौतम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. गौतमने नुकतीच हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला मुलाखत दिली, ज्यामध्ये गौतमने आपल्या निवृत्तीविषयक चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“जोपर्यंत मी चांगला खेळतो आहे, धावा काढतो आहे तोपर्यंत मी नक्कीच निवृत्ती स्विकारणार नाही. प्रत्येक सामन्यात धावा काढल्यानंतर तुम्ही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलता तो आनंद काही औरच असतो. जोपर्यंत माझ्यात ही आवड कायम आहे, तोपर्यंत मी निवृत्ती नक्कीच स्विकारणार नाहीये.” गौतम गंभीर सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळतो आहे.

विजय हजारे चषक स्पर्धेत हरयाणाविरुद्धच्या सामन्यात गौतमच्या खेळीमुळे दिल्लीच्या संघाने विजय संपादन केला होता. भारताकडून गौतम गंभीरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा काढल्या आहेत, तर वन-डे क्रिकेटमध्येही गौतमचा अनुभव मोठा आहे. १४७ वन-डे सामन्यांमध्ये गौतमच्या नावावर ५२३८ धावा जमा आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये गौतमने ३७ सामन्यांत ९३२ धावा काढल्या आहेत.