Gautam Gambhir Questions to Selectors : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतक झळकावले. गुरुवारी (२१ डिसेंबर) झालेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात संजूने ११४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. या शतकामुळे संजूच्या कारकिर्दीला नक्कीच चालना मिळेल. दरम्यान, भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने निवडकर्त्यांना प्रश्न करत म्हटले की, संघ त्याला संधी देईल की नाही हे पाहावे लागेल.
सॅमसनला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये संधी मिळायला हवी –
संजू भारतीय संघाचा नियमित सदस्य नसतो. तो वारंवार संघात आत-बाहेर होत राहतो. शतकानंतर संजूला संघात निवडण्यासाठी निवडकर्त्यांवर दबाव वाढेल, असे गंभीरचे म्हणणे आहे. संजू सॅमसनला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये संधी मिळायला हवी, असे गौतम गंभीरचे मत आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “त्याच्याकडे किती प्रतिभा आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. फक्त आपल्यालाच नाही तर आयपीएलमधील त्याची खेळी पाहणाऱ्या प्रत्येकाला तो किती प्रतिभावान आहे हे माहीत आहे.”
या खेळीने त्याच्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात –
आफ्रिकेविरुद्धच्या संजूच्या शतकाबाबत गंभीर म्हणाला, “या खेळीने त्याच्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात झाली. जेव्हा तुम्ही शतक झळकावता, तेव्हा निवडकर्ते तुमच्यावर केवळ प्रभावित होत नाहीत, तर त्यांच्यावर तुमची निवड करण्याचा दबावही असतो. आता हे पाहावे लागेल निवडकर्ते संजूला संघात किती संधी देतात. कारण पुढील वनडे विश्वचषक चार वर्षे दूर आहे. तरीही सॅमसनची गुणवत्ता पाहता त्याला संघात कायम ठेवावे असे मला वाटते.”
हेही वाचा – IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमार यादव बाहेर?
सॅमसन संघाची मधली फळी मजबूत करू शकतो –
सॅमसन टीम इंडियासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो हे माजी भारतीय फलंदाजाने सांगितले. तो म्हणाला, “भारताकडे नेहमीच मजबूत टॉप ऑर्डर राहिली आहे, पण सॅमसन संघाची मधली फळी मजबूत करू शकतो. तसेच तो एक उत्तम यष्टीरक्षक आहे.” तथापि, गौतम गंभीरला आशा आहे की या शतकानंतर, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजासाठी परिस्थिती बदलेल. कारण त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुन्हा सुरू केली आहे. आता त्याला टीम इंडियामध्ये कायम ठेवायला हवे.