Gautam Gambhir’s Statement on MS Dhoni’s Six: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला यंदा भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता विश्वचषक २०२३ जवळ आल्याचे पाहून प्रतिक्रिया अधिक तीव्र होत आहेत. दुसरीकडे, विश्वचषकापूर्वी २०११ च्या वर्ल्डकपचा भाग असलेला माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरने एक वक्तव्य केले आहे. गौतम गंभीरच्या मते, सर्व खेळाडूंना २०११ चे श्रेय मिळाले नाही. तसेच फक्त धोनीच्या एका षटकाराचीच चर्चा असून तुम्ही संघ विसरलात. त्याचबरोबर गौतम गंभीरने संघातील अनेक स्टार खेळाडूंची नावे सांगितली.
२०११ च्या विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये संघाला विजय मिळवून देण्यासाठी धावांचा पाठलाग करताना तत्कालीन भारतीय कर्णधाराने षटकार ठोकला होता.
एकदिवसीय विश्वचषकाबद्दल ‘रेवस्पोर्ट्स’शी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “आम्ही युवराज सिंगला वर्ल्ड कप २०११ साठी पुरेसे श्रेय दिले नाही. अगदी झहीर, रैना, मुनाफही. सचिन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण आम्ही कशाबद्दल बोलत आहोत? धोनीच्या त्या एका षटकाराबद्दल मीडिया नेहमी बोलत राहतो. तुम्ही फक्त एकाचेच चाहते आहात. तुम्ही संघाला विसरत आहात.”
हेही वाचा – Asia Cup 2023: रोहित-विराट यांच्यात लागली स्पर्धा, सनथ जयसूर्याचा ‘हा’ मोठा विक्रम मोडण्यास दोघेही सज्ज
टीम इंडिया वर्ल्ड कपचा दुष्काण संपवण्यास सज्ज –
टीम इंडियाने शेवटच्या वेळी २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला अनुक्रमे उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले. यावेळी टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरणार आहे. यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकासाठी आपल्या घरच्या मैदानात उतरणार आहे.
पहिला आणि अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार –
विशेष म्हणजे ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम आणि पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.