Gautam says Do not expect a Yashasvi to come and score a century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. अशा परिस्थितीत इतिहास बदलण्याच्या निर्धाराने भारतीय संघ यावेळी दक्षिण आफ्रिकेला गेला आहे. यावेळी कसोटी मालिकेत रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल सलामीच्या भूमिकेत असेल. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेत यशस्वी जैस्वाल यांच्याकडून फार अपेक्षा ठेवू नयेत, असे त्याने म्हटले आहे. गंभीरच्या मते जैस्वालवर आतापासून अपेक्षांचे ओझे टाकणे योग्य नाही. यशस्वी जैस्वालबद्दल बोलायचे झाले, तर दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात त्याची निवड झाली आहे. सेंच्युरियनमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते आणि कर्णधार रोहित शर्मासोबतही तो सलामी देऊ शकतो. यशस्वी जयस्वालने सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
दक्षिण आफ्रिकेत खूप कठीण आव्हान असेल –
यशस्वी जैस्वालवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणू नये असे गौतम गंभीरचे मत आहे. स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान तो म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत खूप कठीण आव्हान असेल. वेगवान आक्रमण खूपच जबरदस्त असेल. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या भारतासारख्याच होत्या. पण दक्षिण आफ्रिकेत जेव्हा तुम्ही मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी किंवा नांद्रे बर्गर खेळता तेव्हा या गोलंदाजांना भरपूर उसळी मिळेल. यशस्वी जैस्वालकडे तो खेळ आहे आणि तो फ्रंटफूट आणि बॅक फूट अशा दोन्ही बाजूंनी खेळू शकतो, पण हे आव्हान वेगळ्या प्रकारचे असेल.”
हेही वाचा – IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
अनुभवाने परिपक्व होत जाईल –
माजी भारतीय दिग्गज म्हणाला, “मला विश्वास आहे की तो अनुभवाने परिपक्व होत जाईल. त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका की एखादा युवा खेळाडू येऊन शतक किंवा द्विशतक करेल. तो शतक झळकावू शकतो. पण जरी त्याने २५-३० धावा केल्या आणि भारताला चांगली सुरुवात दिली, तरी तो एक चांगला खेळाडू म्हणून मायदेशी परतेल. हेच शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना लागू होते.”
हेही वाचा – SA vs IND: ‘बॉक्सिंग डे’ कसोटीवर पावसाचे सावट, क्युरेटरने खेळपट्टीबाबत केले मोठे विधान; जाणून घ्या
याशिवाय गौतम गंभीरने आपला मुद्दा पुढे नेला आणि म्हणाला, “१०-१५ वर्षांपूर्वी, जेव्हा खेळाडू त्यांच्या पहिल्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाला जायचे, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल फारसे बोलत नव्हतो. आपण त्यांच्यावर दबाव आणत नव्हतो. आता जर एखादा युवा खेळाडू प्रथमच दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियात गेला आणि धावा काढू शकला नाही, तर त्याला त्याचप्रमाणे टीकेला सामोरे जावे लागते, जसे त्याने भारतात धावा न केल्यास त्याला सामोरे जावे लागले असते.”