IND vs AUS Gautam Gambhir Press Conference: सिडनी कसोटीतील पहिल्या डावात सॅम कॉन्स्टास आणि जसप्रीत बुमराह यांच्यातत वाद झाला होता. कॉन्स्टासने काहीच कारण नसताना मुद्दाम बुमराहशी वाद घातला आणि वेळ काढू पाहत होता. नेहमी शांत असणारा बुमराहही यादरम्यान वैतागलेला दिसला. आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यानंतर भारतीय संघाचे कोच गौतम गंभीर यांनी यावर उत्तर दिलं आहे.
जसप्रीत बुमराहशी वाद घालणारा ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटर सॅम कॉन्स्टासवर टीका करताना गंभीरने भारतीय कर्णधाराशी त्याला वाद घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सिडनी कसोटीनंतरत्या पत्रकार परिषदेत सॅम कॉन्स्टासच्या या कृतीवर भारतीय खेळाडूंच्या आक्रमक प्रतिक्रियेबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, “हा कठीण खेळ आहे जो तितक्याच ताकदीच्या खेळाडूंमध्ये खेळवला जातो. तिथे तुम्ही नरमाईने गोष्टी घेऊ शकत नाही. मला वाटत नाही की यात काही धमकवण्यासारखं होतं. उस्मान ख्वाजा जेव्हा विनाकारण वेळ काढत होता तेव्हा त्याला जसप्रीत बुमराहला काही बोलण्याचा अधिकार नव्हता. कॉन्स्टासचं यामध्ये काही घेणं देणं नव्हतं. ते पंचांचं काम होतं.”
हेही वाचा – IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
गौतम गंभीरने यानंतर विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात मेलबर्न कसोटीत झालेल्या धक्काबुक्कीवरही वक्तव्य दिले. यावर बोलताना गंभीर म्हणाला, “माझ्यामते आता जे काही घडलं ते आता घडून गेलं आहे आणि या खेळामध्ये अशा गोष्टी घडत असतात. मला नाही वाटतं अशा गोष्टींचा मोठा मुद्दा करण्याची गरज आहे. कसोटी मालिकेत ही काही पहिल्यांदा घडलेली घटना नाही. अशा घटना मागेही घडल्या आहेत, अनेक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पूर्वी अशा गोष्टी केल्या आहेत.”
ऑस्ट्रेलियाने रविवारी सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा ६ गडी राखून पराभव करत पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका ३-१ अशी जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सिडनी कसोटीतील पराभवासह भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. भारताच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावत १६२ धावा करून विजय मिळवला. तब्बल दशकभरानंतर ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.