Gautam Gambhir on India Dressing Room Conversation Leak: भारताने मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सर्वच खेळाडूंना चांगलंच फैलावर घेतलं. : पाच कसोटी सामन्यांसाठीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला पहिला कसोटी सामना सोडल्यास गतविजेत्यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातले काही खेळाडू जरी चांगली कामगिरी करून वेळोवेळी संघाला सावरत असले, तरी सांघिक कामगिरीचा अभाव असल्याचं अनेकांनी वारंवार म्हटलं आहे. आता यावरून गौतम गंभीरने सर्व खेळाडूंनी धारेवर धरल्याची बातमी समोर आली होती.
गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर ‘आता खूप झालं’ या शब्दांत आपला संताप व्यक्त केला. गंभीरनं यावेळी कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही. पण त्याच्या बोलण्याचा पूर्ण रोख हा काही खेळाडू कशाप्रकारे परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी ‘नैसर्गिक खेळा’च्या नावाखाली हवं तसं खेळत होते, असाच होता. पण आता गंभीरने पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील ही चर्चा बाहेर येण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
गौतम गंभीर पत्रकार परिषदेत भारताच्या ड्रेसिंग रूममधील समोर आलेल्या चर्चांबाबत बोलताना सांगितले की, ते फक्त रिपोर्ट्स आहेत, त्यात काही तथ्य नाही. मला नाही वाटत की अशा रिपोर्ट्सवर मी काही उत्तर द्यावं. मी इतकंच सांगू शकतो. प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला मोठ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा आहे.
पुढे गंभीर म्हणाले, “संघ प्रथम. हा सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाला हे समजते. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील वादविवाद त्यांच्यातच राहिले पाहिजेत. ड्रेसिंग रूममधील कोणतेही संभाषण हे ड्रेसिंग रूममध्येच राहिले पाहिजे.”
हेही वाचा – IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती
गौतम गंभीरने सिडनी कसोटी जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे आणि संघातील चर्चांबाबत ही बोलताना सांगितलं की, फक्त एकाच विषयावर चर्चा झाली आणि ती म्हणाजे सिडनी कसोटी कशी जिंकता येईल. याशिवाय कोणत्याच वेगळ्या विषयावर चर्चा झाली नाही. सर्वांनाच कल्पना आहे की हा कसोटी सामना किती महत्त्वाचा असणारा आहे.
कसोटी विजयाबाबत बोलताना गंभीर म्हणाले, खूप आत्मविश्वास आहे. आमच्याकडे तितके कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासू खेळाडू आहेत आणि हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ड्रेसिंग रूममधून पूर्ण पाठिंबा आहे. फक्त हाच कसोटी सामना नाही तर यापुढे भविष्यातही अशा अनेक गोष्टी साध्य करण्याची शक्यता आहे.
भारत वि ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी सामना उद्या म्हणजेच 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. भारताने सिडनी कसोटी जिंकली तर मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पुन्हा भारताकडे येईल.