Gautam Gambhir Gets Angry on Rohit Sharma Retirement Question: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आपले स्थान पक्के केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत सलग चौथा आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. अशातच जेव्हा रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारताच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक संतापले.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधाराने पॉवरप्लेमध्ये संघासाठी महत्त्वाच्या धावा केल्या आहेत. चार सामन्यांमध्ये, त्याने २६.०० च्या सरासरीने आणि १०७.२१ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४१ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने २९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरला विचारण्यात आले की, या स्पर्धेनंतर भारतीय कर्णधार निवृत्ती घेणार का? यावर उत्तर देत रोहितच्या फलंदाजीबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, “आता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे. त्याआधी मी काय बोलू? जर तुमचा कर्णधार एवढ्या वेगाने फलंदाजी करत असेल तर तो ड्रेसिंग रुमला एक चांगला संकेत देतो की संघाला निडर आणि निर्भयपणे खेळायचे आहे.”

गंभीर पुढे म्हणाला, “तुम्ही धावांनी मूल्यांकन करता; आम्ही प्रभावानुसार मूल्यांकन करतो. हा फरक आहे. पत्रकार म्हणून, तज्ज्ञ म्हणून तुम्ही फक्त संख्या, सरासरी बघता. पण एक प्रशिक्षक म्हणून, एक संघ म्हणून आम्ही संख्या किंवा सरासरी बघत नाही. जर कर्णधाराने पुढे होऊन जबाबदारी घेतली तर ड्रेसिंग रूमसाठी यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही.”

कर्णधार रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने प्रथम जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना खेळला. त्याचवर्षी संघ आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. जिथे त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. पुढच्याच वर्षी, टीम इंडियाने ICC टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारत आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला असून यातही रोहित शर्माची महत्त्वाची भूमिका होती.

Story img Loader