Gautam Gambhir on Rohit Sharma Virat Kohli Test Future: भारतीय संघाने तब्बल १ दशकानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत भारताचा ६ विकेट्सने पराभव करत मालिका ३-१ च्या फरकाने जिंकली. चौथ्या कसोटीत विजयाने सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला यानंतर एकही सामना जिंकता आला नाही. मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फॉर्मची मोठी चर्चा होती. रोहितने शेवटच्या कसोटीत स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. सिडनी कसोटीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांना या दोन्ही दिग्गजांच्या भवितव्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकाच पद्धतीने सलग बाद झाल्यामुळे विराट कोहलीवर जोरदार टीका होत आहे. खराब फॉर्ममुळे स्वतः कर्णधार रोहित शर्माने सिडनी कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे अवघड पाऊल उचलूनही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अवघ्या तीन दिवसांत खराब फलंदाजीमुळे भारताला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारताने सिडनी सामना जिंकला असता तर त्यांना मालिका २-२ अशी बरोबरी साधता आली असती.
सिडनी कसोटी सामना संपल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी या मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या भवितव्याबद्दलच्या प्रश्नांवर फार काही खुलून उत्तर दिलं नाही. गंभीर म्हणाले, “मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही.”
यानंतर विराट-रोहितबद्दल बोलताना गंभीर म्हणाले, “या मालिकेनंतर काय निर्णय घ्यायचा हे त्यांच्यावर आहे. हो पण मी हे सांगू शकतो की धावा करण्याची, चांगली कामगिरी करण्याची भूक अजूनही त्यांच्यात आहे. कधीही हार न मानणारे ते खेळाडू आहेत. मला आशा आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आजवर जे काही आले आहेत तेच करतील. जसं मी म्हटलं ते दोघं जे काही निर्णय घेतील तो भारतीय क्रिकेटच्या हिताचा असेल.”
भारताची पुढील कसोटी मालिका जूननंतर खेळवली जाणार आहे. भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. आता कोहली आणि रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंना अधिक काळ संधी द्यायची की नाही हे ठरवण्याचे आव्हान निवडकर्त्यांसमोर असेल.