Gautam Gambhir on Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केली आहेत, त्याने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पदार्पण केले होते. श्रीलंका मालिकेच्या काही महिन्यांपूर्वीच विराटने अंडर-१९ विश्वचषकात टीम इंडियाला जेतेपद मिळवून देऊन इतिहासात आपले नाव नोंदवले होते. आज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्ष पूर्ण केल्यानंतर गौतम गंभीरचा विराट कोहलीबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गौतम गंभीरने विराट कोहलीचे केले कौतुक –
विराट कोहलीबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, ‘जेव्हा त्याने श्रीलंकेत पदार्पण केले होते, तेव्हा मला आठवते की तो पदार्पणाच्या सामन्यात लवकर आऊट झाला होता. पण तो ज्या पद्धतीने नेटमध्ये खेळायचा त्यावरुन मला माहित होते की, तो एक असा खेळाडू आहे जो देशासाठी दीर्घकाळ खेळेल. त्याच्याकडे इतकी प्रतिभा होती की तो जे काही करत होता त्याबद्दल मला आश्चर्य वाटत नव्हते.’
गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘तो एक महान खेळाडू आहे. त्याला आपल्या संघाला सामने कसे जिंकून द्यायचे, हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्याची वृत्ती आणि स्वभाव चांगला आहे. सुरुवातीला भारतीय संघात आल्यानंतर तो ज्या प्रकारे भारताला सामने जिंकून देत होता, हे त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीसाठी सर्वात मोठ्या सकारात्मक गोष्टी ठरल्या.’
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –
१८ ऑगस्ट २००८ रोजी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याने टीम इंडियासाठी सलामी दिली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने २२ चेंडूत १२ धावा केल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा टीम इंडियाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या हाती होती. ज्या सामन्यातून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील ९ खेळाडूंनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यापैकी रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत आहे.
हेही वाचा – विनेश फोगटने गावात पोहोचल्यावर काका महावीर यांना मारली मिठी; म्हणाली, ‘लढा अजून संपलेला नाही…’, पाहा VIDEO
विराट कोहलीच्या पदार्पणाच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन:
गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), इरफान पठाण, हरभजन सिंग, झहीर खान, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल.
© IE Online Media Services (P) Ltd