सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी लढताना चकमकीमध्ये हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने दर्शवली आहे. सोमवारी सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये २५ जवान हुतात्मा झाले होते. हुतात्म्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गौतम गंभीर फाउंडेशनतर्फे केला जाईल असे गौतम गंभीर याने सांगितले. आपण या दिशेनी पाऊल उचलले असल्याची माहिती त्याने दिली. सोमवारी झालेल्या या हल्ल्याने आपणास जबर धक्का बसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या कुटुंबियांचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले तेव्हा माझे मन व्यथित झाले असे गौतम गंभीरने हिंदुस्तान टाइम्सला म्हटले.

ज्या जवानांनी आपल्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असा विचार माझ्या मनात आला आणि मी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निश्चय केला असे गंभीरने म्हटले. या हल्ल्यानंतर खेळावर लक्ष केंद्रित करणे देखील अवघड झाले होते अशी कबुली गंभीरने दिली.  याआधी, सीआरपीएफच्या जवानांना काश्मीरमधील काही तरुणांनी मारहाण व्यक्त केल्यानंतर गौतम गंभीरला राग अनावर झाला होता.

जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवानाला स्थानिक तरुणांनी मारहाण केल्याचा व्हिडीओसमोर आल्यावर गंभीर संतापला होता. जवानाला मारलेल्या एका थपडेच्या बदल्यात १०० जिहादींना ठार मारले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया गौतम गंभीरने यावेळी दिली होती. हा व्हिडीओ बघून देशभरात संतापाची लाट उसळली होती.  माझे आपल्या लष्करावर प्रेम आहे असे त्याने म्हटले. लष्कराची प्रत्येक कृती ही निस्वार्थ भावनेतूनच असते त्यामुळे त्यांची विषयी कृतज्ञता म्हणून मी त्यांच्या मुलांच्या खर्च उचलत असल्याचे गंभीरने म्हटले.

Story img Loader