भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीविरुद्धच्या एका वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आयपीएलमधील सामन्यादरम्यान धोनीला तथाकथित फिनिशर म्हटले. यावेळी त्याने धोनीचे नाव न घेता त्याच्यावर टीका केली. पण, धोनीप्रेमी चाहत्यांनी गंभीरला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले आहे.
दुबईत कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान गंभीरने हे वक्तव्य केले. या सामन्यात गंभीर कॉमेंट्री करत होता. जेव्हा त्याला आजच्या क्रिकेटमध्ये फिनिशरच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने विराट कोहलीला सर्वोत्तम फिनिशर म्हटले. गंभीर म्हणाला, ”आरसीबीचा कर्णधार कोहलीचे आकडे ‘तथाकथित फिनिशर’पेक्षा चांगले आहेत.”
हेही वाचा – पाकिस्तानचा ‘स्टार’ क्रिकेटर रुग्णालयात..! सामन्यादरम्यान चौकार वाचवायला गेला अन्…
गंभीरच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
गंभीर म्हणाला, ”आंद्रे रसेलला फिनिशर म्हणतात. पण माझ्या दृष्टीने विराट कोहली हा गेल्या काही वर्षांत सर्वोत्तम फिनिशर आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. म्हणूनच फक्त ‘फिनिशर’ म्हटल्याने एखादा फिनिशर बनत नाही. ‘तथाकथित फिनिशर्स’च्या तुलनेत विराट कोहली बराच चांगला आहे.”
हे वक्तव्य करताना गंभीरने धोनीचे नाव घेतले नाही. पण चाहत्यांना त्याचे म्हणणे लक्षात आहे. महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, धोनीने आयपीएलमध्ये अनेक प्रसंगी फिनिशरची भूमिका बजावली आहे. मात्र, त्याची बॅट या आयपीएलमध्ये शांत राहिली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये केवळ ६६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ११० होता.