भारताचा माजी डावखुरा फलंदाज आणि सध्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानं निवृत्तीनंतर अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघ किंवा व्यवस्थापनावर गंभीरनं अनेकदा कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. संघात स्थान न दिल्यावरूनही गौतम गंभीर महेंद्रसिंह धोनीवर नाराज असल्याचं बोललं गेलं. या सर्व पार्श्वभूमीवर गौतम गंभीरनं मोठं विधान केलं आहे. २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकप विजयाचं श्रेय भारतात एकाच व्यक्तीला दिलं जात आहे, असं गंभीर म्हणाला आहे. त्याच्या या विधानावर आता नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.
गौतम गंभीरनं न्यूज १८ मध्यप्रदेशला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय क्रिकेट संघ आणि विशेषत: २००७ व २०११ च्या वर्ल्डकपसंदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “कोणताही खेळाडू अंडररेटेड नसतो. मार्केटिंग, पीआर त्याला अंडररेटेड करत असतात. हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय”, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
“युवराज सिंगनंच दोन वर्ल्डकप जिंकून दिले”
भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या दोन वर्ल्डकप स्पर्धांबाबत (२००७ व २०१४) गौतम गंभीरनं भाष्य केलं आहे. “युवराज सिंह भारतीय क्रिकेटचा फार अंडररेटेड खेळाडू आहे. कारण माध्यमांनी त्याचं एवढं कौतुक केलं नाही जेवढं इतरांचं केलं. देशाला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा युवराज सिंग होता. व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू युवराज सिंग आहे”, असं गौतम गंभीर म्हणाला.
“युवराज व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू”
“मी युवराज सिंगसोबत अंडर १६ पासून ते भारतीय संघासाठीही खेळलो आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड खेळाडू भारतात जन्माला आलेला पाहिला नाही. तो १००वा कसोटी सामना खेळू शकला नाही, कारण तेव्हा वीरेंद्र सेहवाग, मी, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस लक्ष्मण, एम. एस. धोनी त्या कसोटी संघात होते. त्यामुळे त्याला टेस्ट टीममध्ये जागा मिळाली नाही. नाहीतर त्यानं किती विक्रम मोडले असते त्याला स्वत:ला माहिती नाही”, असा दावा गंभीरनं केला आहे.
“एका व्यक्तीला मोठं करण्याचा हा प्रयत्न”
“माझं म्हणणंय की आम्हाला टी-२० वर्ल्डकप किंवा २०११ च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत युवराज सिंग घेऊन आला होता. दोन्ही वेळा तो मॅन ऑफ द सीरिज होता. पण दुर्दैवं आहे. २००७ किंवा २०११ च्या वर्ल्डकपबाबत बोलताना आपण युवराज सिंगचं नाव घेत नाही. का नाही घेत? हा फक्त मार्केटिंग, पीआरचा खेळ आहे. एका व्यक्तीला इतरांपेक्षा मोठं करून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अंडररेटेड कुणीच नसतं. मार्केटिंग, पीआर खेळाडूंना अंडररेटेड करतात”, असा दावा यावेळी बोलताना गौतम गंभीरनं केला आहे.
Video: विराटशी झालेल्या भांडणावर गौतम गंभीरनं अखेर सोडलं मौन! १ मेच्या रात्री नेमकं काय घडलं? म्हणाला…!
कुणाला मोठं करण्याचा प्रयत्न होतो?
दरम्यान, यावेळी कोणत्या खेळाडूला मोठं करण्याचा प्रयत्न होतोय? असा प्रश्न विचारला असता त्यावर गौतम गंभीरनं त्या खेळाडूचं नाव न घेता उत्तर दिलं. “तुम्हालाही माहिती आहे तो खेळाडू कोण आहे ते. २००७ आणि २०११ चा वर्ल्डकप कुणी जिंकवून दिला हे वारंवार आपल्याला सांगितलं गेलंय. पण कुणी एक व्यक्तीने वर्ल्डकप जिंकवला नाही. पूर्ण संघानं जिंकवून दिलाय. पूर्ण संघच जिंकतो. एक व्यक्ती कोणतीही मोठी स्पर्धा जिंकवून देत नाही. तसं असतं, तर आत्तापर्यंत भारतानं ५ ते १० वर्ल्डकप जिंकले असते”, असं गंभीर म्हणाला.
“१९८३ च्या वर्ल्डकपसंदर्भात किती लोक मोहिंदर अमरनाथबद्दल बोलतात? कुणाला माहिती आहे मोहिंदर अमरनाथ यांच्या कामगिरीबद्दल? सेमीफायनल आणि फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मोहिंदर अमरनाथ होते. आजपर्यंत फक्त कपिल देव यांचाच ट्रॉफी उचललेला फोटो दाखवला जातो”, असं उदाहरणही गौतम गंभीरनं दिलं.