Gautam Gambhir trolled for his comments during India Pakistan match in Asia Cup 2023: २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. या भारतीय संघाचा भाग असलेला सलामीवीर गौतम गंभीर नेहमी म्हणतो की, कोणताही सामना एका खेळाडमुळे जिंकत नाही, तर संपूर्ण संघामुळे जिंकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये धोनीने विजयी षटकार मारल्याच्या कौतुकाच्या विरोधात गंभीरचे हे विधान येत असते. त्याच्या मते २०११ च्या विश्वचषक विजयामागे युवराज सिंग आणि त्याच्यासारख्या खेळाडूंचा हात होता. त्यामुळे या विजयाचे श्रेय एकट्या धोनीला देणे चुकीचे आहे, असे वक्तव्य गंभीरने वेगवेगळ्या प्रसंगी अनेकदा केले आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने महत्त्वपूर्ण ९७ धावा केल्या होत्या, तर धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या. सामना संपण्यापूर्वी गंभीर बाद झाला असला, तरी धोनीने ४९व्या षटकात नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकून भारताला विजेतेपद मिळवून दिले.
मात्र, आता गंभीरचा सूर बदललेला दिसतो आहे. कारण त्याने नुकत्याच केलेल्या एका विधानात म्हटले आहे की, शेवटच्या धावा करणारा खेळाडूच सामना जिंकवून देतो.
शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्या आशिया चषक २०२३ च्या सामन्यात समालोचन करताना गंभीरने हे विधान केले. २०१० च्या आशिया कपमध्ये भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय विजयाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, “जो खेळाडू विजयी धावा करतो तोच संघाला सामना जिंकून देतो.
स्टार स्पोर्ट्स शो दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणाला, “गंभीरने ८० धावा केल्या आणि आम्ही २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक सामना जिंकला.” याला उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला, “नाही, हरभजनने आम्हाला सामना जिंकून दिला. त्याने षटकार मारून सामना जिंकला. माझा विश्वास आहे की जो विजयी धावा करतो तो संघासाठी सामना जिंकतो.”
गौतम गंभीरचे हे नवे विधान ऐकल्यानंतर चाहते, पुन्हा एकदा त्याच्यावर टीका करत आहेत. त्याचबरोबर २०११च्या विश्वचषकातील धोनीच्या विजयी षटकाराच्या जुन्या विधानाची आठवण करून देत आहेत.