कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली यांना आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे दंड ठोठावण्यात आला आहे. विजय मिळवल्यानंतर गंभीरने मैदानातील एका खुर्चीला लाथ मारली, तर कोहलीने षटकांची गती संथ राखली होती. गंभीरने मात्र या प्रकरणी माफी मागितली.
आयपीएलमधील बंगळुरूविरुद्धचा सामना चांगला रंगला होता. युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांनी संघाला मोठे फटके मारत विजय मिळवून दिला. त्यानंतर गंभीरने खुर्चीला लाथ मारली होती. या प्रकरणी त्याला सामन्याच्या मानधनापैकी १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
कोहलीकडून या हंगामात दुसऱ्यांदा षटकांची गती संथ राखण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर संघातील प्रत्येक खेळाडूच्या सामन्याच्या मानधनातून २५ टक्के किंवा सहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.