Border Gavaskar Trophy Gautam Gambhir Wanted Cheteshwar Pujara in squad : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील पाच कसोटी सामन्यांपैकी चार सामने पार पडले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने दोन आणि भारताने एक सामना जिंकला असून एक अनिर्णीत राहिला आहे. आता पाचवी कसोटी ३ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे. दरम्यान, एक मोठा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बीजीटीमध्ये चेतेश्वर पुजाराला संघात हवा आहे, अशी मागणी केली होती, परंतु निवडकर्त्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताची ड्रेसिंग रूम शांत नव्हती. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संघाच्या अलीकडच्या खराब कामगिरीने कंटाळले आहेत. त्यांनी खेळाडूंचे कठोर मूल्यांकन केले आहे. १०० हून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा पुजारा, ओव्हल येथे २०२३ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे, जिथे भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. त्या सामन्याच्या दोन्ही डावात पुजाराने १४ आणि २७ धावा केल्या होत्या.
चेतेश्वर पुजाराची कामगिरी-
मात्र, सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारतीय अव्वल फळी अपयशी ठरल्याने, ऑस्ट्रेलियातील ११ सामन्यांत ४७.२८ च्या सरासरीने ९९३ धावा करणाऱ्या पुजारासारखा खेळाडू मोठा फरक पाडू शकला असता. आता बातम्या समोर आल्या आहेत की, टीम इंडियाने पर्थमधील पहिली कसोटी जिंकली असली, तरी गौतम गंभीरने ३६ वर्षीय सौराष्ट्रच्या फलंदाजाबद्दल चर्चा केली होती. २०१८-१९ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत पुजारा १२५८ चेंडूत ५२१ धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यानंतर तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय फलंदाजीचा तो कणा ठरला. जेव्हा त्याने ९२८ चेंडूत २७१ धावा केल्या होत्या, ज्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियातील दोन्ही मालिका जिंकण्यात मदत झाली.
हेही वाचा – Ind vs Aus: “आता खूप झालं”, गौतम गंभीर वैतागला; चौथ्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला धरलं धारेवर!
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनेही यंदा मालिकेपूर्वी पुजाराचे कौतुक केले होते आणि पुजारा यावेळी नसणे चांगले नाही असे म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये, चेतेश्वर पुजाराने राजकोटमध्ये छत्तीसगड विरुद्ध सौराष्ट्रासाठी २५ वे रणजी शतक झळकावले आणि त्याचे १८ व्या प्रथम श्रेणी द्विशतकात रूपांतर केले. या पराक्रमासह, तो फक्त डॉन ब्रॅडमन (३७), वॅली हॅमंड (३६) आणि पॅटसी हेन्ड्रेन (२२) यांच्या मागे आहे. प्रथम श्रेणीतील सर्वाधिक द्विशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आहे. तो रेड बॉल क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये दिसला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. तो या मालिकेत कॉमेंट्री करताना दिसला.