भारताला कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या २ मालिकांमध्ये मोठ्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील पराभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद पणाला लागले आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला आहे. रोहितनंतर बुमराह पुढील कसोटी कर्णधार असेल अशी चर्चा होती पण आता त्याची दुखापत पाहता यावर सर्वांचे एकमत होताना दिसत नाहीय.
दैनिक जागरणमधील नव्या रिपोर्टनुसार रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार कोण असेल ही नावे समोर आली, पण अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात या नावावरून मतभेद असल्याचे समोर आले.
शनिवारी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत भावी कर्णधारावर चर्चा झाल्याचे वृत्त दैनिक जागरणने यापूर्वीच दिले होते. यामध्ये रोहित म्हणाला होता की, मी नवीन कर्णधार जोपर्यंत निवडला जात नाही, तोवर कर्णधार असेन. बुमराह हा भारताचा कसोटी कर्णधार होण्यासाठी आघाडीवर आहे, परंतु त्याच्या फिटनेसची चिंता पाहता, तो दीर्घकालीन पर्याय असल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत त्याने कर्णधारपद भूषवले, पण दुखापतीमुळे तो पाचवा सामना खेळू शकला नाही.
रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे, असा रिपोर्ट समोर आला होता. भारतीय संघाला जून-जुलैमध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. रोहित पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बुमराह हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल. पण त्याच्या अनुपस्थितीत भारताचा असा उपकर्णधार संघ निवडत आहे जो संघाचे योग्य नेतृत्त्व करेल.
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत योग्य उपकर्णधाराबाबतही चर्चा झाली, कारण कसोटीशिवाय ३० वर्षांचा बुमराह वनडे आणि टी-२० मध्येही महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. अजित आगरकरच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतला पसंती दर्शवली आहे, पण प्रशिक्षक गंभीरने यशस्वी जैस्वालचं नाव सुचवत त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताची भावी कसोटी उपकर्णधार यशस्वी जैस्वाल असावा, अशी भारताच्या कोचची इच्छा आहे.
सूर्यकुमार यादव हा टी-२० संघाचा कर्णधार आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये सूर्याला आपले स्थान अद्याप मिळवता आलेले नाही, त्यामुळे तो वनडेमध्ये संघाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता फारच कमी आहे. तीन फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार असणं योग्य नसेल. त्यामुळे बुमराह एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये कर्णधाराची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक योग्य उपकर्णधार निवडणं महत्त्वाचं असणार आहे. जेणेकरून जेव्हा बुमराहला विश्रांती दिली जाईल तेव्हा उपकर्णधार कर्णधार म्हणून संघाचे योग्य नेतृत्त्व करेल.