आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु असताना मध्यावरच दिल्ली डेअरडेविल्स संघाचं कर्णधारपद सोडल्यामुळे, गौतम गंभीर चांगलाच चर्चेत आला होता. पहिल्या काही सामन्यांमध्ये दिल्लीचा संघ फारशी चांगली कामगिरी करु न शकल्यामुळे दिल्लीचा संघ अखेरच्या स्थानांवर फेकला गेला. या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्विकारत गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचं ठरवलं. त्याच्या या निर्णयाचा सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींनी मान राखत, त्याचं कौतुकही केलं. मात्र भारताच्या निवड समितीचे माजी सदस्य संदीप पाटील यांनी, या सर्व परिस्थितीसाठी त्यालाच दोषी ठरवलं आहे. ‘द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या स्तंभामध्ये पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत.
अवश्य वाचा – त्या ‘गंभीर’ निर्णयामुळं नेटकरी गौतमच्या प्रेमात
“भारतीय क्रिकेटमधला एक महान खेळाडू बनण्याची गौतम गंभीरकडे संधी होती. मात्र त्याने ती स्वतःच्या हाताने वाया घालवली. २०११ साली भारतीय संघांच्या इंग्लंड दौऱ्यात एका सामन्यादरम्यान गंभीरच्या डोक्याला चेंडू लागला, या घटनेनंतर गौतमने उर्वरित सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये गौतमला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नव्हती व तो सामने खेळू शकला असता. त्यादरम्यान मी NCA च्या संचालकपदी होतो. डॉक्टरांचा अहवाल आणि त्यावर गौतमने घेतलेला निर्णय पाहून मलाही त्यावेळी चांगलचं आश्चर्य वाटलं.” आपल्या लेखात पाटील यांनी हे मत मांडलं आहे.
आयपीएलमध्ये दिल्लीचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे, एक व्यक्ती म्हणून मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र यापाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे गौतमच चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, पाटील यांनी आपलं मत मांडलं. “काही वर्षांपूर्वी गौतम गंभीरचं भारतीय संघातलं स्थान अबाधित होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात गौतमची कामगिरी ढासळलेली असताना, मी निवड समितीचा अध्यक्ष या नात्याने शिखर धवन आणि मुरली विजयला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुरली विजयने कसोटी संघात सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आणि गौतमचे भारतीय संघातले दरवाजे बंद झाले. या घटनेनंतर गौतमने आमच्यातली मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर आम्ही जेव्हा कधी भेटलो तेव्हा केवळ औपचारिकता म्हणून तो माझ्याशी बोलतो किंवा हसतो.” गंभीरला संघात जागा न मिळण्याबद्दल पाटील यांनी आपलं मत मांडलं.
निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मैत्री, भावना या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. देशासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करणं हे माझं त्यावेळी काम होतं. मात्र दुर्दैवाने गौतम गंभीरने त्या घटनेनंतर आपल्याशी केवळ नावापुरते संबंध ठेवणं पसतं केलं. त्याच्या याच स्वभावामुळे भारतीय संघातलं स्थान तो गमावुन बसल्याचंही पाटील म्हणाले.
अवश्य वाचा – गौतम गंभीरला संघातून वगळण्याच्या निर्णयावर श्रेयस अय्यरने केला खुलासा