अनधिकृत कसोटी सामना
फिरकीपटू कृष्णाप्पा गौतमने घेतलेल्या सहा बळींमुळे न्यूझीलंड अ संघाचा पहिला डाव ३९८ धावांमध्ये गुंडाळणे भारत अ संघाला शक्य झाले. तिसऱ्या दिवसअखेरीस भारत अ संघाने दुसऱ्या डावात १ बाद ३८ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यामध्ये गौतमने आपल्या फिरकीची कमाल दाखवत यजमानांना चारशेच्या आत रोखले. गौतमने ४७ षटकांत १३९ धावा देत ६ गडी टिपले. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस रविकुमार समर्थ (नाबाद २७) आणि अंकित बावणे (नाबाद ५) यांनी पुढील पडझड रोखली.
त्याआधी न्यूझीलंडने ३ बाद १२१ धावसंख्येवरून त्यांचा डाव पुढे सुरू केला. न्यूझीलंड अ संघाचा मधल्या फळीतील फलंदाज कॅमेरून फ्लेचरने २२१ चेंडूंचा सामना करत झुंजार १०३ धावांची खेळी केली. त्याला टिम सेफर्ट (८६), डग ब्रेसवेल (५५) आणि काइल जेमिसन (५३) यांनी मोलाची साथ दिल्याने न्यूझीलंड अ संघाला भारत अ संघावर पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी मिळवणे शक्य झाले.
संक्षिप्त धावफलक
भारत अ (पहिला डाव) : सर्व बाद ३२३ आणि (दुसरा डाव) १ बाद ३८ (रविकुमार समर्थ २७; ब्रेसवेल १/१७)
न्यूझीलंड अ (पहिला डाव) : १३१.४ षटकांत सर्व बाद ३९८ (कॅमेरून फ्लेचर १०३, टिम सेफर्ट ८६; कृष्णाप्पा गौतम ६/१३९)