सर डॉन ब्रॅडमन व भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर यांच्याइतकीच योग्यता सुनील गावस्कर यांच्याकडे होती, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांनी सांगितले.
गावस्कर यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात बोलताना नाडकर्णी म्हणाले, ‘‘ब्रॅडमन यांच्याइतकीच गावस्कर यांच्याकडे अव्वल दर्जाची फलंदाजी करण्याची शैली होती. गावस्कर यांनी हेल्मेट उपलब्ध असूनही त्याचा उपयोग न करता क्रिकेट कारकीर्द गाजवली. कसोटी सामन्यांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावा काढणारा पहिला फलंदाज म्हणून गावस्कर यांनी विक्रम नोंदविला होता. त्यांच्या वेळी फारसे कसोटी सामने होत नसत तसेच दोन वर्षांमध्ये एकदा कसोटी सामने आयोजित केले जात असत. कधी कधी भारतीय खेळाडूंना कसोटी सामन्यांसाठी चार वर्षेही थांबावी लागली आहेत. असे असूनही गावस्कर यांनी ही किमया केली आहे.’’
‘‘क्रिकेट कारकिर्दीत गावस्कर यांनी टप्प्याटप्प्याने कीर्तिमान शिखर गाठले आहे. सुरुवातीला आंतरशालेय, त्यानंतर आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा त्यांनी गाजविल्या आहेत. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी संघनिष्ठा जपली होती तसेच कधीही त्यांनी एकाग्रता ढळू दिली नाही. आमच्या वेळी क्रिकेटमध्ये गावस्कर, टेनिसमध्ये रामनाथन कृष्णन, बॅडमिंटनमध्ये नंदू नाटेकर हे आदर्श खेळाडू मानले जात असत,’’ असे नाडकर्णी यांनी सांगितले.
गावस्कर यांचे मुंबई संघातील सहकारी मिलिंद रेगे म्हणाले, ‘‘गावस्करांसमवेत मी शाळा व महाविद्यालयीन संघात तसेच मुंबई संघाकडून खेळत असे. शाळा व महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धामध्ये गावस्कर यांनी खूप काही धावा केल्या नाहीत. मात्र आंतरविद्यापीठ स्पर्धेत गावस्कर यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. आमच्या वेळी आंतरविद्यापीठ स्पर्धाना क्रिकेट कारकिर्दीत खूप महत्त्व दिले जात असे. रणजी पदार्पणात गावस्कर यांना अपयश आल्यानंतर मुंबई संघातून वगळण्यातही आले होते. मात्र पुन्हा त्यांनी स्थानिक सामन्यांमध्ये भरपूर धावा केल्यानंतर त्यांना मुंबईकडून पुन्हा संधी मिळाली. धावांसाठी भुकेलेला फलंदाज म्हणून ख्याती झालेल्या गावस्कर यांनी केव्हा कसोटी संघात झेप घेतली हे मला कळलेच नाही. द्रुतगती गोलंदाजांसमोर खेळताना संयम, एकाग्रता व आत्मविश्वास कसा पाहिजे हे गावस्कर यांच्याकडूनच शिकले पाहिजे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचेच सचिन तेंडुलकर याने अनुकरण केले आहे.’’

Story img Loader