शालेय क्रिकेटच्या क्षितिजावर पृथ्वी शॉ आता तेजाने तळपतो आहे. काही दिवसांपूर्वी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पध्रेत ५४६ धावांची विक्रमी खेळी साकारून तो प्रकाशझोतात आला. त्याच्या यशाबाबत त्याची पाठ थोपटली आहे, ती साक्षात महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी. रिझव्ही स्प्रिंगफिल्डचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्या खेळीचे गावस्कर यांनी अभिनंदन करणारे पत्र लिहून त्याचे कौतुक केले आहे.
‘‘प्रिय पृथ्वी.. तुझ्या ५४६ धावांच्या खेळीचे अभिनंदन करण्यासाठीच हे छोटेसे पत्र. छान फलंदाजी केलीस. धावांची भूक अशीच कायम ठेव आणि एक लक्षात ठेव शतक हे आधी महत्त्वाचे असते. तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा, देव तुला यश देवो,’’ असे गावस्करांनी या पत्रात म्हटले आहे.
उदयोन्मुख क्रिकेटपटूला गावस्कर यांनी हे प्रथमच पत्र लिहिले नव्हते. ऑगस्ट १९८७ मध्ये गावस्कर यांनी सचिन तेंडुलकरलाही पत्र लिहून त्याचा उत्साह वाढवला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटपटूचा पुरस्कार न मिळाल्यामुळे सचिन नाराज होता. परंतु गावस्करांच्या पत्रामुळे त्याला प्रेरणा मिळाली होती. त्या पत्रात गावस्कर सचिनला म्हणाले होते, ‘‘तू मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आधीच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीकडे पाहिलेस तर आणखी एक नाव तुला दिसणार नाही. परंतु या व्यक्तीने कसोटी क्रिकेटमध्ये फारशी वाईट कामगिरी केलेली नाही.’’
गावस्कर यांच्या पत्रामुळे भारावलेल्या पृथ्वी शॉने सांगितले की, ‘‘गावस्कर सरांचे पत्र मिळाल्यामुळे मला अभिमानास्पद वाटते आहे. मी गावस्कर यांच्या फलंदाजीची चित्रणे अनेकदा पाहिली आहेत, मी त्यांचा चाहता आहे. माझ्या आयुष्यात या पत्राचे महत्त्व अमूल्य आहे.’’

Story img Loader