किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्होसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या खेळाडूंना आगामी विश्वचषकासाठी वगळल्यामुळे वेस्ट इंडिजच्या निवड समितीवर तडाखेबंद सलामीवीर ख्रिस गेलने ताशेरे ओढले आहेत. माजी विश्वविजेते कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही घोषणा केली असून त्यांच्या या निर्णयाला बऱ्याच जणांनी चांगलेच फटकारले आहे.
‘‘पोलार्ड आणि ब्राव्होसारखे नावाजलेले खेळाडू विश्वचषकाच्या संघात कसे असू शकत नाहीत, हा मला पडलेला फार मोठा प्रश्न आहे. या निर्णयाकडे पाहिल्यावर हे दोघेही राजकारणाचे शिकार ठरले असल्याचे जाणवते. हे फार दुर्दैवी असून या निर्णयाने मी दुखावलो गेलो आहे. संघनिवड करण्यात आलेली असली तरी मी माझ्या भावना व्यक्त करत आहे,’’ असे गेल म्हणाला.
पोलार्ड आणि ब्राव्हो यांच्याबाबत गेल म्हणाला की, ‘‘पोलार्ड आणि ब्राव्हो हे संघाचे आधारस्तंभ आहेत. या दोघांनीही संघाला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे या विश्वचषकामध्ये त्यांची निवड निश्चित समजली जात होती. पण निवड समितीचा हा निर्णय अनाकलनीय असाच आहे. हे दोघेही संघात नसल्यामुळे संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दर्जेदार वाटत नाही.’’
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटबद्दल तो म्हणाला की, ‘‘या निर्णयामुळे वेस्ट इंडिजचे क्रिकेट नेमके कुठे चालले आहे, हे कळत नाही. चांगल्या खेळाडूंना वगळण्यात काय हशील आहे, हे समजत नाही. ’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा