संध्याकाळच्या संधिप्रकाशात मातीचं क्रीडांगण आखलेलं.. उत्साही कबड्डीपटूंचा ताफा जमू लागतो.. आणि थोडय़ाच वेळात ‘कबड्डी, कबड्डी’चा नाद घुमू लागतो. हा नादच भारताच्या प्राचीन खेळाचे मूलतत्त्व. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने या आवाजाला कॉर्पोरेट कोंदण लाभलं. मंडळांऐवजी फ्रँचाइजींचे आगमन झाले. मात्र प्रतिस्पर्धी संघाचा गडी बाद करण्यासाठी उतरलेल्या खेळाडूच्या मुखातला ‘कबड्डी, कबड्डी’ मंत्र कायम होता. जिंकण्यासाठीची प्रचंड चुरस, त्यासाठी रचले जाणारे डावपेच, मैदानात पाश्र्वभूमीला असणारा चाहत्यांचा जल्लोष आणि दणाणून टाकणारे संगीत या गोंधळात कबड्डी कबड्डी हा मूलमंत्र हरवला. या मूलमंत्राला खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रो-कबड्डी संयोजक तिसऱ्या हंगामात हा मूलमंत्र स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत उच्चारणे अनिवार्य करण्याच्या विचाराधीन आहेत. प्रो कबड्डी तिसऱ्या हंगामाची घोषणा राजधानी नवी दिल्लीत करण्यात आली.
‘‘कबड्डीला विविध राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. त्यानुसार ‘कबड्डी, कबड्डी’ म्हणण्याची पद्धतही भिन्न आहे. स्थानिक स्पर्धामध्ये आजही कबड्डीपटू स्पष्टपणे हा मंत्र म्हणत प्रतिस्पध्र्याच्या खेळाडूवर आक्रमण करतात. प्रत्येक खेळाचे स्वत:चे असे ठोस वेगळेपण असते. हा मंत्र कबड्डी खेळातलं अनोखेपण आहे. लीगआधारित स्पर्धेमध्ये ते हरवू न देता जपले जावे अशी आमची भूमिका आहे. दोन हंगामांचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आमच्या ही गोष्ट लक्षात आली. ‘कबड्डी, कबड्डी’ म्हणण्याचे प्रमाण आणि त्यातली स्पष्टता धुसर झाल्याने तिसऱ्या हंगामापासून यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, यावर विचारविमर्श सुरू आहे,’’ असे प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
टेलिव्हिजनवर चाहत्यांच्या प्रतिसादाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘पहिल्या हंगामात, ४० मिनिटांपैकी १६ मिनिटे पाहण्याचे सरासरी प्रमाण होते. दुसऱ्या हंगामात हे प्रमाण वाढून १८ मिनिटांवर स्थिरावले. खेळाचा कमी कालावधी लक्षात घेता हे प्रमाण लक्षणीय आहे. क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० सामना पाहण्याच्या सरासरीशी हे प्रमाण साधम्र्य राखणारे आहे. हा आमच्यासाठी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद असून, म्हणूनच येत्या बारा महिन्यांच्या कालावधीत
प्रो कबड्डीचे तीन हंगाम रंगणार आहेत.’’
हैदराबादच्या लढती विशाखापट्टणम्ला प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात हैदराबाद येथील लढतींनी होणार होती. मात्र त्या कालावधीत हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने या लढती आता विशाखापट्टणम् येथे होतील.
होऊ दे आवाज.. ‘कबड्डी, कबड्डी’!
संध्याकाळच्या संधिप्रकाशात मातीचं क्रीडांगण आखलेलं.. उत्साही कबड्डीपटूंचा ताफा जमू लागतो..
First published on: 22-01-2016 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gear up for star sports pro kabaddi league season