विश्व अजिंक्यपद स्पर्धेत गेल्यावर्षी कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या गीता फोगटचे आव्हान यंदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. अझेरबैजानची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती युलिया रात्केव्हिचने गीताला ५९ किलो वजनी गटात पहिल्याच फेरीत पराभूत केले. त्याचबरोबर भारताच्या पुजा धांडा (५५ किलो) आणि गीतिका जाखर (६३ किलो) यांचेही आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले आहे.
गेल्या वर्षी ५५ किलो वजनी गटात खेळताना गीताने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. पण यावेळी ५९ किलो वजनी गटात खेळताना मात्र गीताला आपली कामगिरी कायम राखता आली नाही. युलियाविरुद्ध खेळताना गीताने सुरुवातीला तीन गुण पटकावले होते, पण त्यानंतर युलियाने दमदार खेळ करत गीताची पाठ टेकवण्यात यश मिळवले आणि विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुजाला गतवर्षीची कांस्यपदक विजेती युक्रेनच्या इरिना हुसयाकने ०-८ असे पराभूत केले, तर गीतिकावर बेलारुसच्या मारिया मामाशुकने ५-० पहिल्या फेरीत विजय मिळवला.

Story img Loader