Gerald Coetzee has been ruled out of the second Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पेल्विकची सूज आली होती. त्यामुळे गेराल्ड कोएत्झी दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. पहिल्या कसोटी सामन्यात, गेराल्ड कोएत्झीने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली होती.
दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का –
पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात गेराल्डने शानदार गोलंदाजी केली. जरी त्याला एकच विकेट मिळाली. यादरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या गेराल्डने १८ चेंडूत १९ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ चौकार आणि एक शानदार षटकार लगावला. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ आता दुसऱ्या कसोटी सामन्यात गेराल्डच्या जागी लुंगी एनगीडीचा समावेश करू शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल –
सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला केवळ १३१ धावांत गुंडाळले होते. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही मोठा फायदा मिळवला. पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुणतालिकेत पहिले स्थान गाठले.
हेही वाचा – AUS vs PAK : मोहम्मद रिझवानला ‘फॅशन’ पडली महागात, रिस्टबँडला चेंडू लागल्याने झाला आऊट, पाहा VIDEO
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ –
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेने, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्गी, डीन एल्गर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कीगन पीटरसन.