अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांची बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे बार्सिलोना क्लबकडून स्पष्ट करण्यात आले.
‘‘पुढील दोन मोसमांसाठी आम्ही गेराडरे मार्टिनो यांची सेवा घेण्याचे ठरवले आहे. करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी ते लवकरच बार्सिलोनात दाखल होतील. त्याबाबतचा कार्यक्रम आम्ही लवकरच ठरवणार आहोत,’’ असे क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.
बुधवारी बायर्न म्युनिचविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी मार्टिनो हे बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता धूसर आहे. मात्र १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पॅनिश लीगच्या मोसमासाठी मार्टिनो आपला कार्यभार स्वीकारतील. कर्करोगाशी सामना करावा लागत असल्यामुळे टिटो व्हिलानोव्हा यांनी काही आठवडय़ांपूर्वीच बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे बार्सिलोनाला नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागला. खेळाडू म्हणून १९९१मध्ये टेनेरिफकडून स्पेनमध्ये खेळणाऱ्या मार्टिनो यांना युरोपियन फुटबॉलमध्ये प्रशिक्षकाचा अनुभव नाही. मात्र पॅराग्वे आणि अर्जेटिनाच्या प्रशिक्षकपदी चांगली कामगिरी केल्यामुळेच त्यांना बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाली.
मार्टिनो यांनी २००२ ते २००६ दरम्यान पॅराग्वेला चार जेतेपदे मिळवून दिली. त्यानंतर अर्जेटिना संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना त्यांनी संघाला २०१० फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारून दिली. मात्र उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाला स्पेनकडून ०-१ अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मार्टिनो यांच्या मार्गदर्शनाखाली पॅराग्वेने २०११मध्ये कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. बार्सिलोनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या शिफारशीमुळेच मार्टिनो यांची प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे.

Story img Loader