German Open Badminton मुलहेम : जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) बुधवारी भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि मिथुन मंजुनाथ यांना, तर महिला विभागात मालविका बनसोड आणि पात्रता फेरीतून आलेल्या तस्निम मीर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्या फेरीत राष्ट्रीय विजेत्या मंजुनाथने पराभवापूर्वी सिंगापूरच्या चौथ्या मानांकित लोह किन येऊला चांगला प्रतिकार केला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत लोहने मंजुनाथचा २१-८, १९-२१, २१-११ असा पराभव केला. ही लढत ५९ मिनिटे चालली. सहाव्या मानांकित लक्ष्यला फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोवने १९-२१, १६-२१ असे ४६ मिनिटात नमवले. बरोबरीत चालणाऱ्या पहिल्या गेममध्ये लक्ष्यला निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावता आला नाही. पहिला गेम १९-१९ अशा बरोबरीत असताना लोहने सलग दोन गुण घेतले. त्यानंतर दुसऱ्या गेमला लक्ष्यला प्रतिस्पध्र्याचा सामनाच करता आला नाही.
महिला एकेरीत मालविकाला चीनच्या पाचव्या मानांकित वँग झी यीकडून २१-१३, २१-१४ असा, तर पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या तस्निमला थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगकडून ८-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.