एपी, म्युनिक
घरचे मैदान आणि प्रेक्षकांसमोर यजमान जर्मनी संघाने युरो फुटबॉल स्पर्धेला पाच गोलची दणदणीत सलामी दिली. सहा गोल झालेल्या सामन्यात सहाही गोल जर्मनीकडूनच झाले. रुडीगरने केलेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीने सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडला ५-१ असे पराभूत केले.
सामन्याचा मानकरी ठरलेला जमाल मुसिआला, २१ वर्षीय फ्लोरियन विर्ट्झ, कई हॅवर्ट्झ, निकलास फुलक्रग आणि एम्रे कान यांनी जर्मनीसाठी गोल केले. अँन्टोनियो रुडीगरच्या स्वयंगोलने स्कॉटलंडच्या नावावर एकमात्र गोल नोंदला गेला. मुसियाला आणि विर्ट्झ हे युरो स्पर्धेत गोल करणारे सर्वात युवा खेळाडू ठरले. मुसिआला विर्ट्झपेक्षा ६७ दिवसांनी मोठा आहे. स्कॉटलंडने २००३नंतर प्रथमच एका सामन्यात पाच गोल स्वीकारले. तेव्हा युरो पात्रता फेरीत नेदरलँड्सकडून स्कॉटलंडला ०-६ असा पराभव पत्करावा लागला होता. जर्मनीची आक्रमकता, पासिंग आणि गोल जाळीच्या दिशेने त्यांनी मारलेले फटके सगळेच स्कॉटलंडच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवणारे होते. स्पर्धेतील जर्मनीमधील वातावरण आणि उत्साह वाढवण्यासाठी, तसेच खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी हा निर्णय नक्कीच आदर्श होता. अखेरच्या तीन मोठ्या स्पर्धांमधून झटपट बाहेर पडावे लागल्यामुळे जर्मनीकडून या स्पर्धेत फारशा चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा बाळगण्यात आलेल्या नव्हत्या. पण, त्यांनी सलामीच्या लढतीत आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवून एकार्थी स्वत:लाच प्रेरित केले.
हेही वाचा >>> IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”
संपूर्ण सामन्यावर जर्मनीचे वर्चस्व होते हे सांगायला नको. सामन्यात त्यांनी चेंडूवर ७३ टक्के राखलेले वर्चस्व, सर्वाधिक दिलेले पास आणि जाळीच्या दिशेने मारलेले १० फटके याचीच साक्ष देतात. पहिल्या वीस मिनिटाच्या खेळानेच जर्मनीने सर्वांना प्रभावित केले. पहिल्या सत्रात १०व्या मिनिटाला विर्ट्झ, १९व्या मिनिटाला मुसिआला आणि पूर्वार्धाच्या अगदी अखेरीस हॅवर्ट्झने गोल करून विश्रांतीलाच जर्मनीने ३-० असे वर्चस्व राखले होते. पूर्वार्धाच्या अखेरच्या क्षणाला खरे, तर जर्मनीचा मैदानी गोल हुकला होता. पण, चेंडू अजूनही गोलपोस्टच्या समोर राहिल्याने गोल करण्याच्या इराद्याने पुढे आलेल्या जर्मनीच्या खेळाडूला धोकादायक पद्धतीने अडथळा आणल्याने पंचांनी तिसऱ्या पंचाची (वार) मदत घेत पेनल्टीचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंडच्या रायन पोर्टियसला रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. त्यामुळे स्कॉटलंडला उत्तरार्ध १० खेळाडूंसहच खेळावे लागले. उत्तरार्धात फुलक्रग आणि कान यांनी गोल करून स्कॉटलंडची चिंता वाढवली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत फुलक्रगने आपला तिसरा गोलही राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यावर केला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात रुडीगरच्या स्वयं गोलमुळे स्कॉटलंडला खाते उघडल्याचा दिलासा मिळाला.
आम्हाला अशीच सुरुवात अपेक्षित होती. या विजयाने निर्माण झालेले वातावरण, स्टेडियमवरील पाठीराख्यांचा उत्साह आम्हाला पुढील प्रवासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
– इल्काय गुंडोगन, जर्मनीचा कर्णधार.