गत ऑलिम्पिक विजेता जर्मनी, अर्जेटिना आणि नेदरलँडच्या पुरुष हॉकी संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील प्रवेश निश्चित केला आहे. या तिन्ही संघांनी वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करताना ही पात्रता मिळवली.
जर्मनीने अंतिम सामन्यात यजमान अर्जेटिनाचा ४-१ असा पराभव केला, तर लंडन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या नेदरलँडने कॅनडाचा ६-० असा धुव्वा उडवून तिसरे स्थान पक्के केले. या निकालामुळे जर्मनी, अर्जेटिना आणि नेदरलँड यांनी रिओसह भारतात होणाऱ्या हॉकी विश्व लीग अंतिम फेरीतही स्थान पटकावले आहे.
ख्रिस्तोफर रुऱ्ह आणि निक्लास वेल्लेन यांनी प्रत्येकी एक गोल करून जर्मनीला २-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु अर्जेटिनाच्या जुआन गिलार्डीने पेनल्टीवर गोल करताना ही आघाडी २-१ अशी कमी केली. मात्र, रुऱ्हने दुसरा गोल नोंदवत ही आघाडी ३-१ अशी भक्कम केली. फ्लोरिअन फुचने अखेरचा गोल करताना जर्मनीचा ४-१ असा विजय निश्चित केला.
नेदरलँडनेही काँस्टाटीन जॉकंर (२ गोल), बिल्ली बेकर, मिंक व्ॉन डेर विर्डेन, रॉबर्ट केम्पेर्मन आणि रॉबर्ट व्ॉन डेर हॉर्स्ट यांनी प्रत्येकी एक गोलच्या बळावर कॅनडावर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. नेदरलँडच्या आक्रमक खेळाचे उत्तर कॅनडाला अखेपर्यंत सापडलेच नाही.