श्वाइनस्टॅइगरचे दमदार पुनरागमन; युक्रेनवर मात
विश्वविजेत्या जर्मनी संघाने युरोपियन अजिंक्यपद अर्थात युरो चषकाच्या चौथ्या जेतेपदाच्या अभियानाची विजयी सुरुवात केली. जर्मनीने सलामीच्या लढतीत रविवारी युक्रेनवर २-० अशी मात केली.
टोनी क्रुसने सातत्यपूर्ण खेळ करत जर्मनीकडे चेंडू राहील याची काळजी घेतली. श्रोदान मुस्ताफीने १९व्या मिनिटाला गोल करत जर्मनीचे खाते उघडले. मात्र युक्रेनच्या आघाडीपटूंनी जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरच्या कौशल्याची परीक्षा पाहिली. जर्मनीचा अनुभवी बॅस्टिअन श्वाइनस्टॅइगरने भरपाई वेळेत गोल करत जर्मनीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मेस्युट ओझिलच्या पासवर सुरेख गोल करत बॅस्टिअनने आपल्या कौशल्याची प्रचीती दिली. ९०व्या मिनिटाला श्वाइनस्टॅइगर मैदानावर आला आणि दोनच मिनिटांत गोल केला.
गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे श्वाइनस्टॅइगर तीन महिने फुटबॉलपासून दूर होता. युरो चषकासारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेत सलामीच्या लढतीत गोल करत श्वाइनस्टॅइगरने आपली उपयुक्तता सिद्ध केली. जर्मनीचे प्रतिनिधित्व करताना श्वाइनस्टॅइगरने पाच वर्षांनंतर गोल केला.
विश्वचषकात जर्मनीच्या संघाने अफलातून प्रदर्शन केले होते. मात्र त्यानंतरच्या १८ पैकी ७ लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आर्यलड प्रजासत्ताक आणि इंग्लंडने त्यांच्यावर विजय मिळवला. युक्रेनविरुद्धच्या याआधीच्या पाच लढतींमध्ये जर्मनीने निर्भेळ यश मिळवले होते. मात्र रविवारी झालेल्या लढतीत युक्रेनने जर्मनीला विजयासाठी संघर्ष करायला लावला. मारिओ गोत्झेला रोखण्यात युक्रेनने यश मिळवले. त्याला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यातही अपयश आले. सामन्याच्या उत्तरार्धात जर्मनीने लौकिकाला साजेसा खेळ
केला. क्रोएशियाचा ल्युका मॉड्रिकप्रमाणे टोनी क्रुसने जर्मनीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दुसऱ्यांदा युरो चषकासाठी पात्र ठरलेल्या युक्रेनने गोल करण्याच्या संधी मावळल्या.
जर्मनीने युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना एकदाही सलामीचा सामना गमावलेला नाही. युक्रेनविरुद्ध जर्मनीने विक्रम कायम राखला.
गोल करण्याचा आनंद म्हणून मी प्रचंड धावलो. त्यामुळे थकवा जाणवत आहे. गोल केल्याचा आनंद अद्भुत आहे. पण त्याहीपेक्षा संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो, हे महत्त्वाचे आहे.
– बॅस्टिअन श्वाइनस्टॅइगर , जर्मनीचा खेळाडू बॅस्टिअनने
केलेले पुनरागमन शानदार होते. आम्ही विजय मिळवला, मात्र युक्रेनच्या बचावाला दाद द्यायला हवी. पोलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला सुधारणा करावी लागेल
– जोअॅकिम लो, जर्मनीचे प्रशिक्षक