गेला महिनाभर सुरू असलेला विश्वविजेतेपदापर्यंतचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिना आणि युरोपमधील जर्मनी हे फुटबॉलमधील महासत्ता समजले जाणारे संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी रविवारी ऐतिहासिक मॅराकाना स्टेडियमवर भिडणार आहेत. जर्मनी २४ वर्षांनंतर, तर अर्जेटिना संघ २८ वर्षांनंतर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे.
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या यजमान ब्राझीलच्या ७-१ अशा चिंधडय़ा उडवणाऱ्या जर्मनीचे ‘हौसले बुंलद’ आहेत, तर दुसरीकडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्जेटिनाला उपांत्य फेरीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण पेनल्टी-शूटआऊटमध्ये मेस्सी आणि कंपनीने नेदरलँड्सवर विजय मिळवत १९९०नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. मेस्सीने आपल्या सर्वागसुंदर खेळाने स्पेन आणि युरोपीयन क्लबवर अधिराज्य गाजवले आहे. चार वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीच्या खात्यात फक्त विश्वचषकाची भर पडलेली नाही. त्यामुळेच पेले, रोनाल्डो, झिनेदिन झिदान आणि दिएगो मॅराडोना या महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे.
फॉर्म, दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत जर्मनी आणि अर्जेटिना हे फुटबॉल संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या चार विश्वचषक स्पर्धामध्ये उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे आता मॅराकाना स्टेडियमवर इतिहास रचण्यासाठी जर्मनीचा संघ उत्सुक आहे. यजमान ब्राझीलला घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता अर्जेटिनावरही मात करण्यासाठी जोकिम लो यांच्या प्रशिक्षकपदाखालील जर्मनी संघ सज्ज झाला आहे. उपांत्य फेरीच्या जर्मनीच्या संघात कोणतेही बदल न करण्याचे जोकिम लो यांनी ठरवले आहे. थॉमस म्युलर, मिरोस्लाव्ह क्लोस हे आघाडीवीर, मेसूत ओझिल, टोनी क्रूस व आंद्रे शुरले हे मधल्या फळीत आणि बास्तियन श्वाइनस्टायगर, सॅमी खेडिरा, फिलिप लॅम हे बचाव फळीत आणि मॅन्युएल न्यूअरसारखा गोलरक्षक असा जर्मनीचा संघ असणार आहे.
अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांना मात्र अँजेल डी मारिया दुखापतीतून सावरण्याची चिंता लागून राहिली आहे. अर्जेटिनाचा संघ मेस्सीवर अवलंबून असला तरी त्यांच्या बचाव फळीने नेदरलँड्सच्या दिग्गज आक्रमकवीरांना रोखून धरले होते. जेवियर मॅस्चेरानो याने आर्येन रॉबेनचा फटका परतवून लावत अर्जेटिनाला धोक्याच्या स्थितीतून बाहेर काढले होते. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मेस्सीसह गोंझालो हिग्युएन आणि सर्जिओ अॅग्युरो हे कितपत यशस्वी ठरतात, यावर अर्जेटिनाचा विश्वचषकाचा निकाल अवलंबून असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा