हॅम्बर्ग : युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत आज, शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींत बलाढ्यांच्या द्वंद्वाची पर्वणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीची गाठ यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या स्पेनशी, तर दुसऱ्या सामन्यात फ्रान्सची गाठ पोर्तुगालशी पडणार आहे.
युरो स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यासह खेळताना जर्मनीने चमकदार खेळ केला आहे. साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने डेन्मार्कवर २-० असा विजय मिळवला. मात्र, आता स्पेनविरुद्ध त्यांच्या गुणवत्तेची आणि क्षमतेची कसोटी लागणार आहे.
स्पेनच्या संघाने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकत आणि प्रतिस्पर्धांना एकही गोल न करू देत थाटात बाद फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत सुरुवातीला त्यांना जॉर्जियाकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. जॉर्जियाने आघाडीही मिळवली होती. परंतु त्यानंतर स्पेनने आपला खेळ उंचावताना दमदार पुनरागमन केले आणि हा सामना ४-१ अशा मोठ्या फरकाने जिंकला.
हेही वाचा >>>रोड शोनंतर मरीन ड्राईव्हची कशी आहे परिस्थिती? चपलांचा ढीग अन्… VIDEO मध्ये पाहा क्वीन नेकलेसवरील सद्यस्थिती!
जर्मनी आणि स्पेन या दोनही संघांत तारांकित खेळाडूंचा भरणा आहे. जर्मनीसाठी युवा आक्रमकपटू जमाल मुसियाला आणि काय हावेट्झ यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तसेच अनुभवी मध्यरक्षक टोनी क्रूसची ही अखेरची स्पर्धा असल्याने त्याला जेतेपदासह निरोप देण्याचा जर्मनीचा प्रयत्न असेल. मात्र, त्यासाठी आधी त्यांना स्पेनला नमवावे लागेल. स्पेनचे सर्वच खेळाडू लयीत आहे. मात्र, त्यातही १६ वर्षीय लेमिन यमाल आणि २१ वर्षीय निको विल्यम्स या युवा आक्रमकांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे आता या दोघांपासून जर्मनीला सावध राहावे लागेल.
दुसरीकडे, फ्रान्ससमोर पोर्तुगालचे तगडे आव्हान असणार आहे. दोन्ही संघांना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी संघांची झुंज मोडून काढावी लागली. फ्रान्सने बेल्जियमवर १-० असा निसटता विजय मिळवला, तर पोर्तुगालला स्लोव्हेनियला नमवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे आता दोन्ही संघांना कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागेल. यात जो संघ यशस्वी ठरेल, तो स्पर्धेतील आव्हान कायम राखू शकेल.
रोनाल्डो, एम्बापेवर लक्ष
पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्यातील सामन्यात सर्वांचे लक्ष ख्रिास्तियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बापचे यांच्या कामगिरीवर असेल. गेला दशकभराहूनही अधिक काळ रोनाल्डोने जागतिक फुटबॉलवर वर्चस्व गाजवले. आता त्याचा उत्तराधिकारी, फुटबॉलचा वर्तमान आणि भविष्य म्हणून एम्बापेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण चमक दाखवणार आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
युरो स्पर्धेत आज
●वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
●थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २,३
पोर्तुगाल वि. फ्रान्स