विश्वचषक स्पर्धेत सरस कामगिरीच्या जोरावर उपांत्यफेरीत दाखल झालेल्या जर्मन वादाळाचा यजमान ब्राझील संघाला जोरदार तडाखा बसला. बारा वर्षांनंतर विश्वचषकावर नाव कोरण्याच्या ब्राझीलच्या स्वप्नांचा जर्मनीने ७-१ असा चुराडा करून टाकला.
उपांत्य फेरीच्या या पहिल्या लढतीत बलाढ्य जर्मनीसमोर ब्राझील पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसला. सामना सुरू होऊन जेमतेम अर्धातास झाला नसेल आणि जर्मनीच्या खात्यात ५ गोलची नोंद झाली होती, तर दुसरीकडे नेयमार आणि सिल्वाच्या अनुपस्थितीत खेळणारा ब्राझील संघ सुयोग्य खेळ करण्याच्या भानगडीत धडपडताना दिसला. सामन्यात ब्राझेलीयन स्टार नेयमारची कमतरता स्पष्टपणे जाणवली.
सामन्याच्या ११व्या मिनिटाला जर्मनीचा जबरदस्त फॉर्मात असलेल्या थॉमस म्युलरने ‘कॉर्नरकिक’ वरून आलेल्या फुटबॉलला थेट ब्राझीलच्या गोलपोस्ट धाडले आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २३व्या मिनिटाला मिरोस्लाव्ह क्लोसने शानदार गोल करत विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत १६ गोल नोंदविण्याचा विक्रम रचला. या धक्क्यातून यजमान संघ सावरण्याआधीच पुढच्या मिनिटाला क्रुसने जर्मनीसाठी तिसरा गोल केला आणि त्यापाठोपाठ जर्मन धक्क्यांची मालिका सुरूच राहीली. क्रुसने २६व्या मिनिटाला पुन्हा एकदा थरारक गोल केला, तर खेडीरानेही तुफानी गोल करत ब्राझीलचा खुर्दा उडवला. अशाप्रकारे सामन्याच्या पहिल्या सत्रात जर्मनीने ब्राझीलवर ५-० अशी आघाडी प्राप्त केली.
दुसऱया सत्रात जर्मनीला प्रत्युत्तर देण्याचा पोकळ प्रयत्न ब्राझील संघ करताना दिसला. ब्राझीलच्या आक्रमणांना थोपवून ठेवण्यातही जर्मनीने बाजी मारली. त्यानंतर क्लोसच्या जागी पाठविण्यात आलेल्या आंद्रे शेहुर्लेने ६९व्या आणि ७९ व्या मिनिटांना दोन खणखणीत गोल करून संघाला ७-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याचा निकाल अगदी सुस्पष्ट झाल्याने दुसऱ्या सत्राअंती अतिरिक्त वेळ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरते शेवटी सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या सुयोग्य पासवर ब्राझीलच्या ऑस्करने कसाबसा गोल नोंदविला आणि ब्राझीलचे खाते उघडले.
सामन्यात दोन शानदार गोल नोंदविणारा क्रुस सामनावीर ठरला

* मिरोस्लाव्ह क्लोसचा विश्वविक्रम

जर्मनी संघातील अनुभवी आणि आक्रमणवीर मिरोस्लाव्ह क्लोसने सामन्याच्या २३व्या मिनिटाला गोल नोंदविला आणि विश्वचषक स्पर्धेत १६ गोल नोंदविण्याचा विक्रम केला. याआधी क्लोसने ब्राझीलच्या रोनाल्डोच्या १५ गोल्सशी बरोबरी साधली होती. या सामन्यात क्लोसने एक गोल करून आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण १६ गोल करण्याचा विक्रम रचला.

Story img Loader