फुटबॉल विश्वात दक्षिण आफ्रिका खंडातील देशांच्या वाढत्या वर्चस्वाचा प्रत्यय जगभरातल्या फुटबॉलप्रेमींना आला. नायजेरिया, कॅमेरून आणि आयव्हरी कोस्ट यांच्यापाठोपाठ अल्जेरिया आणि घाना या देशांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे याच चार देशांनी २०१० फुटबॉल विश्वचषकात आफ्रिका खंडाचे प्रतिनिधित्व केले होते. फ्रान्स आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पोर्तुगालने विश्वचषकात दिमाखादारपणे धडक मारली.
अल्जेरियाने बुरकिना फासोवर १-० अशी मात करत चौथ्यांदा विश्वचषक वारीचे तिकीट मिळवले. दुसऱ्या मैदानावर केलेल्या गोलच्या संख्येच्या निकषावर अल्जेरियाला ही संधी मिळाली. याआधी या दोन संघांत झालेल्या मुकाबल्यात फासोने ३-२ अशी बाजी मारली होती. यामुळे मंगळवारी झालेला मुकाबला चुरशीचा ठरला. कर्णधार मादजिद बोऊघेराने गोल करत अल्जेरियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यंदाच्या हंगामात झालेल्या आफ्रिका चषकात फासोने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. फासो संघाचा बचाव मजबूत होता मात्र आक्रमणात ते निष्प्रभ ठरले.
दुसरीकडे इजिप्तविरुद्ध पराभवाला सामोरे गेल्यानंतरही घानाने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकासाठी पात्र होण्याचा मान मिळवला. याआधी या दोन संघात झालेल्या मुकाबल्यात घानाने इजिप्तवर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. गोल करण्याच्या निकषावर ७-३ पुढे असल्याने घानाला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. घानातर्फे केव्हिन प्रिन्स बोइटंगने एकमेव गोल केला तर इजिप्तकडून अम्र हसान आणि गेडोने प्रत्येकी एक गोल केला.
युक्रेनविरुद्धच्या लढतीत प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात दमदार वर्चस्व गाजवत फ्रान्सने बाजी मारली. २२व्या मिनिटाला मामाडोऊ साखोने फ्रान्सने पहिला गोल केला. ३४व्या मिनिटाला करिम बेन्झामाने दुसरा गोल केला. मध्यंतरानंतर ७२व्या मिनिटाला ओल्ह ह्य़ुसेव्हच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने ३-० असा विजय मिळवला. क्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पोर्तुगालने स्वीडनला ३-२ असे नमवले आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले. रोनाल्डोने ५०व्या, ७७व्या आणि ७९व्या मिनिटाला गोल केले. स्वीडनतर्फे इब्राहिमोव्हिकने दोन गोल केले.