नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. मात्र, तूर्तास तरी आपण ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित केले आहे, असे वक्तव्य गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२४ वर्षीय गिलने गेल्या हंगामात सर्वाधिक ८९० धावा केल्या होत्या. यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये गिलचा समावेश आहे. असे असले तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी गिलचे भारतीय संघातील स्थान निश्चित नाही.

‘‘भारतासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीच नाही. मात्र, मी केवळ ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करत राहिलो, तर तो माझा सध्याचा संघ (गुजरात टायटन्स) आणि माझ्यावर अन्याय असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी माझी निवड झाली तर उत्तमच. परंतु तूर्तास तरी माझे पूर्ण लक्ष ‘आयपीएल’वर आहे. कर्णधार म्हणून अन्य खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि स्वत: सर्वोत्तम कामगिरी करून अन्य खेळाडूंचे काम सोपे करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे गिल म्हणाला.

हेही वाचा >>>SRH vs RCB : आरसीबीने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

‘‘खेळाडू म्हणून तुम्हाला अर्थातच विश्वचषकात खेळायचे असते. ट्वेन्टी-२० विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा मान आहे. गेल्या वर्षी मला एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. आता आणखी एका विश्वचषकात खेळायला मला नक्कीच आवडेल. मात्र, मी फार पुढचा विचार करणे टाळतो आहे,’’ असेही गिलने सांगितले.

अपयशातूनच शिकायला मिळते!

गिलकडे भारतीय क्रिकेटचे वर्तमान आणि भविष्य म्हणून पाहिले जात आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत गिलने यशस्वी कामगिरी केली आहे. मात्र, आपल्याला अपयशातून अधिक शिकायला मिळाल्याचे गिल सांगतो. ‘‘तुम्हाला मिळालेले यश तुमचा दर्जा ठरवते, पण यशातून तुम्हाला फार काही शिकायला मिळत नाही. यशामुळे तुमच्यात गर्विष्ठपणा येण्याची भीती असते. याउलट अपयश तुम्हाला खूप गोष्टी शिकवते. माणूस आणि खेळाडू म्हणून प्रगती करायची असल्यास अपयशही महत्त्वाचे असते,’’ असे गिलने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gill statement that twenty20 world cup is important but for now the focus is on ipl sport news amy