अजय ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली गिरिकूजन संस्थेच्या तुकडीने लडाख हिमालयातील छामसेर कांगरी (२१ हजार ८०१ फूट) या शिखरावर नुकतीच यशस्वी चढाई केली. या मोहिमेत अजय ढमढेरे, रवींद्र पांचाळ, शशिकांत लोखंडे, कल्याणी कुलकर्णी, दीपक मोरे यांनी २३ जुलै रोजी प्रतिकूल वारे व हवामानास तोंड देत या शिखरावर पाऊल ठेवले. त्यांनी १८ हजार ८६५ फूट उंचीवर असलेल्या बेसकॅम्पवरुन पहाटे साडेतीन वाजता या चढाईस प्रारंभ केला. सरासरी ६५ ते ७० अंश कोनात असलेल्या अतिशय ठिसूळ घसाऱ्यावरुन साडेदहा तासांच्या अथक चढाईनंतर ते शिखरावर पोहोचले.  लेहपासून दक्षिणेस २४० किलोमीटर अंतरावर छामसेर कांगरी (२१हजार ८०१ फूट) व लुंगसेर कांगरी (६ हजार ६६६ मीटर) ही दोन शिखरे आहेत. या मोहिमेत लुंगसेर कांगरी शिखरावरही चढाई केली जाणार होती, मात्र या मोहिमेतील सदस्यांना साथ देणारे पोर्टर्स (भारवाहक) आजारी पडल्यामुळे त्यांना लुंगसेर शिखरावर चढाई करता आली नाही.