युवराज सिंग उत्कृष्ट खेळाडू असून महत्वाच्या क्षणी तो संघासाठी जबरदस्त कामगिरी करतो याचा मला आनंद असल्याचे मत रॉलच चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
आयपीएलच्या या मोसमाच्या सुरूवातीच्या सामन्यांत युवराज अपयशी होताना दिसला. त्याबद्दल युवराजवर टीका-टीपण्णी सुरू झाल्या होत्या. त्याबाबत बोलत असताना विराट म्हणाला की, “युवराजच्या फॉर्म बद्दल अनेकांनी टीकेची झोड उठवली परंतु, हे योग्य नाही. युवराज मातब्बर खेळाडू आहे. त्याच्यातील खिलाडूवृत्ती अप्रतिम आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये युवराजने दमदार अर्धशतक ठोकले आणि दोन्ही सामन्यांत संघासाठी विजयश्री घेचून आणली. त्यामुळे महत्वाच्या क्षणी संघासाठी दमदार कामगिरी करणे सोपी गोष्ट नाही. युवराज महत्वाच्या क्षणी संघासाठी धावून येत असल्याचा मला आनंद आहे.” असेही विराट म्हणाला.  
तसेच “युवराज जगातील उच्च दर्जाचा खेळाडू असून त्याच्या फलंदाजीची तोड नाही. विश्वचषकातील त्याने केलेल्या दमदार कामगिरीचा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. त्याने दोन्ही विश्वचषकात भारताच्या बाजूने एकहाती फलंदाजी केली होती. याचा विसर पडू नये अशीच अपेक्षा आहे.” असेही कोहली पुढे म्हणाला.