अचाट, अद्भुत, अविश्वसनीय, न भूतो न भविष्यती, अचंबित, अकल्पित अशी विशेषणं आपल्याला एकाचवेळी वापरायला लागतील असं काही अभावानेच घडतं. पण मंगळवारी मुंबईत समुद्राच्या साक्षीने वानखेडे स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलने अशी काही खेळी केली ही सगळी विशेषणं, उपमा, अलंकार उपयोगात आणावंच लागलं. ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना म्हणजे कांगारु जिंकणार अशी अटकळ. पण अफगाणिस्तान आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यांनी २९१ धावा केल्या. ३०० चेंडूत २९२ धावा करणं वर्ल्डकप काय, कुठल्याही सामन्यात, कुठेही कठीणच लक्ष्य आहे. अफगाणिस्तानने सव्वा तासात ऑस्ट्रेलियाची ९१/७ अशी अवस्था केली. मुंबईत पुढच्या अर्ध्या तासात इतिहास घडणार हे जवळपास स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलियाच्या काही कट्टर चाहत्यांनी मैदान सोडायला सुरूवात केली.
अगदी आतापर्यंत लिंबूटिंबू समजलं जाणारं अफगाणिस्तान ५ वेळा जगज्जेते ऑस्ट्रेलियाला लोळवणार हे दिसत होतं. पण ऑस्ट्रेलियन वाण वेगळा असतो. ते सहजी काही सोडत नाहीत आणि ते कुठूनही परत येतात. फलंदाज म्हणावा या यादीतला फक्त मॅक्सवेल बाकी होता. २०० धावा हव्या होत्या. तीनच विकेट्स शिल्लक होत्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पार विळखा घातलेला. विन प्रेडिक्टरवर ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची संधी एक टक्काही दाखवत नव्हतं. मैदानात मरणाचं उकडत होतं आणि लिटरवारी घाम सांडत होता. नामुष्की काही मिनिटांवर आली होती. पण मॅक्सवेलने ठरवलं आणि पुढच्या दोन अडीच तासात जे घडलं त्यावर तिथे असलेल्या, टीव्हीवर-मोबाईलवर पाहिलेल्या कुणाचाही विश्वास बसणार नाही.
पायात गोळे-पेटगे आल्याने जर्जर झालेल्या मॅक्सवेलने नाबाद द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. २१ चौकार आणि १० षटकारांची लयलूट मॅक्सवेलने केली. मॅक्सवेलला धावता काय, चालताही येत नव्हतं पण त्याही स्थितीत तो तुफान मारत सुटला. त्याची बॅट ज्या चेंडूला लागत होती तो चौकार किंवा षटकारच जात होता. त्याने मारलेले काही फटके विस्मयचकित करणारे होते. ज्या माणसाला पायही हलवता येत नाहीये तो फक्त कुटत गेला. ७ साथीदार सांगण्यासारखं काहीही न करता माघारी गेलेले असताना मॅक्सवेलने विविधढंगी फटक्यांची मुक्त पोतडी उघडली. कोणताही गोलंदाज आणा, कुठेही क्षेत्ररक्षक उभा करा, कुठेही चेंडू टाका- मॅक्सवेल जिथे मारायचं ठरवायचा तिथे चेंडू पिटाळला जात होता.
मैदानातले चाहते, समालोचक सगळे स्तंभित झाले होते. मॅक्सवेलच्या अंगात काय संचारलं आहे तेच कळेना. बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करलेली असताना मॅक्सवेल मात्र अंगणात खेळावं इतक्या सहजतेने चोपत होता. उष्णता आणि आर्द्रता इतकी होती अनेकदा असं वाटलं हा मैदान सोडणार. आता बहुतेक स्ट्रेचरवरुनच न्यावं लागणार पण आपण रिटायर होऊन आत गेलो तर बाकीचे नांगी टाकतील याची त्याला खात्री होती. त्यामुळे एका पायावर मॅक्सवेलने संघाला जिंकून दिलं. मॅक्सवेलला साथ मिळाली कर्णधार पॅट कमिन्सची. या जोडीने आठव्या विकेटसाठी १७० चेंडूत नाबाद २०२ धावांची भागीदारी केली. यामध्ये कमिन्सचा वाटा होता १२ धावांचा. यावरुन मॅक्सवेलच्या अमानवी वाटणाऱ्या खेळाचा प्रत्यय येईल. मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावा केल्या. किती विक्रम मोडले काही गणतीच नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावातला दुसरा सर्वोत्तम स्कोअर होता- २४. मॅक्सवेलच्या सुनामीने अफगाणिस्तानचं जिंकण्याचं स्वप्न जवळच्याच समुद्रात नाहीसं झालं. मॅक्सवेलरुपी घाव भरुन यायला अफगाणिस्तानच्या खेळाडूंना वेळ लागेल पण त्यांनी सामन्याच्या ७० टक्के भागावर वर्चस्व गाजवलं हेही तितकंच खरं.
पण क्रिकेट जे नियमितपणे पाहतात त्यांना मॅक्सवेलकडून अशा खेळीची अपेक्षा प्रदीर्घ काळापासून होती. श्रद्धेने क्रिकेट फॉलो करणारी मंडळी ग्लेन मॅक्सवेल हे नाव उच्चारलं की हळहळतात. हो, तुम्ही योग्य वाचलंत. हळहळतात. विलक्षण प्रतिभेला सातत्याची झालर नसेल तर ती गुणवत्ता काय कामाची. असाधारण प्रतिभेला बेफिकिरीचा शाप असेल तर लोक उसासे टाकतात. मॅक्सवेलचं नाव घेतलं की क्रिकेटरसिकांना अगदी हेच वाटतं. दहावी बारावीच्या वर्गात कसं विद्यार्थ्यांचं वर्गीकरण होतं. जात्याच हुशार ते गाळसाळ अशी प्रतवारी असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून मॅक्सवेलचं नाव नेहमी विलक्षण प्रतिभावान गटात घेतलं जातं. पण ताळेबंद मांडताना त्याचं नाव मूळ गट सोडून भरकटलेलं असतं. ग्लेन मॅक्सवेलचा लोकांना हेवा वाटतो. ग्लेन मॅक्सवेल हे एक कोडं आहे आणि एक गूढही. दिव्य पुरुषांच्या चेहऱ्यामागे कशी प्रभा असते तसं मॅक्सवेलच्या नावाला वलयरुपी प्रभा आहे. मोठा खेळाडू, गुणवान खेळाडू, मॅचविनर खेळाडू असं सगळं त्याच्याबाबत बोललं जातं पण लोक विश्वास ठेऊ लागतात तोवर मॅक्सवेल हास्यास्पद वाटणारा फटका मारुन बाद झालेला असतो.
तर मॅक्सवेल नेमकं काय करतो? बॅटरुपी तलवारीतून अशक्यप्राय वाटणारे फटके मारतो. तुम्हाला विश्वासच बसणार नाही असे काही फटके असतात. ऑनसाईडला मारलेला फटका ऑफसाईडला षटकार जाऊ शकतो. रिव्हर्स स्कूप, रिव्हर्स स्विच काय वाट्टेल ते करतो. कधी बॅट दांडपट्टयासारखी चालवतो कधी बेसबॉलसारखी. क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकांनुसार बॅटपॅड एकत्र ठेऊन सरळ बॅटने हायबॅकलिफ्टने खेळणं प्रमाण मानलं जातं. गोलंदाजांचा आणि चांगल्या चेंडूंचा सन्मान करायला शिकवलं जातं. काही चेंडू विकेटकीपरच्या दिशेने सोडायचे असतात हेही सांगितलं जातं. क्रीझमध्ये भक्कम पाय रोवून उभं राहायचं हेही सांगणं असतं. मॅक्सवेल हा माणूसच सिलबॅसबाहेरचा आहे त्यामुळे क्रमिक नियम त्याला लागू होत नाहीत. सोप्या शब्दात सांगायचं तर चेंडूच्या ठिकऱ्या उडवतो आणि गोलंदाजांचं मानसिक खच्चीकरण करतो.
मॅक्सवेल उत्तम फिरकीपटू आहे. कामचलाऊ नव्हे, व्यवस्थित गोलंदाजी करतो. कर्णधार पॉवरप्लेमध्ये त्याला गोलंदाजी देण्याचं धाडस करतात म्हणजे बघा. एखाद्या फलंदाजांना चोप दिला तरी बावरुन जात नाही. याबरोबरीने अफलातून क्षेत्ररक्षक आहे. आधुनिक काळात झेल घेण्याचे नवे पायंडे पडत आहेत. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक असतो. चेंडू त्याच्या दिशेने येतो. चेंडू सीमारेषेपल्याड जाणार असं वाटत असतानाच हवेत उडी मारायची. झेल टिपायचा. पण त्याचवेळी शरीर सीमारेषेपलीकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर पकडलेला चेंडू आतल्या दिशेने पुन्हा हवेत उडवायचा. सीमारेषेपल्याड जायचं, अलगद परत आत येऊन तो झेल टिपायचा. वाचताना जेवढं सोपं वाटतंय तेवढंच अमलात आणायला कठीण असा हा प्रकार आहे. मॅक्सवेल त्यात वाकबगार आहे. युट्यूबवर मॅक्सवेल फिल्डिंग टाकलंत तर त्याचे हे चित्तथरारक खेळ तुम्हाला पाहता येतील. बाकी मैदानात कुठेही उभं करा. मॅक्सवेलच्या झेल सोडतच नाही. पडलेल्या स्थितीतून, एकच स्टंप दिसत असतानाही मॅक्सवेल रनआऊट करतो.
हे एवढं सगळं करणारा माणूस किती भारी असं तुम्हाला वाटलं असेल. तसं वाटणं साहजिक पण तरीही मॅक्सवेल अजूनही लिजंड खेळाडूंच्या मांदियाळीत गणला जात नाही याचं कारण सातत्याचा अभाव. एक सामना ठसठशीत आठवतो. २७ चेंडूत १ धाव हवी असताना मॅक्सवेल खेळायला उतरतो आणि वाईड चेंडूला बॅट लावून बाद होतो. सरळ बॅटने खेळणं कठीण अशा खेळपट्टीवर आल्या आल्या रिव्हर्स स्वीप करायला जाऊन बाद होतो. आता स्थिरावला वाटत असतानाच अर्ध्या क्रीझमध्ये येऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देतो. कसला मोह होतो कल्पना नाही पण विकेट टाकणं-फेकणं मॅक्सवेलच्या आणि संघाच्याही अंगवळणी पडलेलं. अपेक्षा त्यांच्याकडूनच केल्या जातात ज्यांची क्षमता असते. मॅक्सवेल काय करु शकतो याची जाणीव चाहत्यांना आहे. शिस्त लागेल, विकेट जपेल असं त्याच्या बाबतीत वाटत राहतं. मध्येमध्ये तसे प्रयत्नही दिसतात पण मॅक्सवेल हा मुक्तछंदी कारभार आहे. मायकेल बेव्हन, माईक हसी, अँड्यू सायमंड्स या यादीत त्याचं नाव घ्यावंसं वाटतं पण घेता येत नाही कारण सातत्य नाही. आज मॅक्सवेल मॅच काढतो असं मनाला समजावेपर्यंत तो तंबूत परतही आलेला असतो. गंमत म्हणजे हे त्यालाही माहितेय. काही वर्षांपूर्वी रांचीत झालेल्या टेस्टमध्ये मॅक्सवेलने अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी करुन संयमी शतक झळकावलं होतं. तो मॅक्सवेल वेगळाच कुणीतरी भासला होता.
ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेतला एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. गोलंदाज चेंडू टाकतो, मॅक्सवेल पाहत बसतो आणि चेंडू येऊन स्टंप्स-बेल्स उडवतो. मॅक्सवेल नक्की काय पाहत बसलेला आपल्याला काही कळत नाही. पण ज्यादिवशी मॅक्सवेलला सूर सापडतो त्यादिवशी गोलंदाज तुच्छ होतात. एरव्ही मॅक्सवेल खडूस वगैरे नाही पण फलंदाजी करताना दयामाया, करुणा काहीही नाही. तो सपासर वार करत जातो. गोलंदाजांनी प्रार्थना करायची की आज मॅक्सवेलला सूर सापडायला नको. सापडला तर खैरात पक्की. मॅक्सवेल ज्या क्रमांकावर खेळायला येतो तिथे आल्यापासूनच तुडवायला सुरु करावं लागतं हे खरं पण दरवेळी विकेट फेकायलाच हवी असा काही नियम नाही.
वर्ल्डकपसाठी मॅक्सवेल फिट होईल का याविषयी साशंकता होती. प्रदीर्घ अशा रिहॅब प्रक्रियेतून तो नुकताच बाहेर आला होता. काही दिवसांपूर्वीच गोल्फ खेळताना तो पडला होता. एका सामन्यात त्याला खेळताही आलं नाही. मंगळवारी खेळायला उतरला आणि असं खेळून गेला की आयुष्यभर लक्षात राहील. अशक्यप्राय वाटणाऱ्या त्या खेळीतही मॅक्सवेलला दोनदा जीवनदान मिळालं. दोनदा रिव्ह्यूने वाचवलं. पण म्हणतात ना, धाडसी माणसांना नशीब साथ देतं. प्रचंड उकाड्यात ५० षटकं क्षेत्ररक्षण, त्यातही १० षटकं गोलंदाजी केल्यावर मॅक्सवेलने ही खेळी साकारली आहे हे लक्षात घ्यायला हवं. घरच्या मैदानावर सगळेच वाघ असतात. दुसऱ्यांच्या घरी खेळताना तुम्ही दमदार कामगिरी करत असाल तर तुमचं नाणं खणखणीत मानलं जातं.
आयपीएल चाहत्यांना मॅक्सवेल हे नाव नवीन नाही. मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हिल्स अशा संघांचा तो भाग राहिला आहे. तिथेही त्याच्या नावाभोवती प्रभावळ असते. काहीवेळेस त्याचा ऑरा दिसतो, बाकीवेळेस नुसतीच चर्चा होते. मॅक्सवेलची पत्नी भारतीय आहे. या नात्याने तो भारताचा जावई आहे. भारतात त्याचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यालाही मॅक्सवेल लिहिलेले पिवळे शर्ट भरपूर दिसत होते. त्याच्या नावाला ब्रँडव्हॅल्यू आहे आणि ती त्याच्या क्षमतेमुळे आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वर्ल्डकप हे एक वेगळंच गुळपीठ आहे. बॉर्डर असो, वॉ असो, पॉन्टिंग असो किंवा क्लार्क- ते दणकाच उडवतात. तशी त्यांची टीमही असते. वर्ल्डकपमध्ये ते खेळत नाहीत, ते चिरडतात. आता परिस्थिती बदलली आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मॅक्सवेलच्या या ऐतिहासिक खेळीने ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप मोहिमेत नव्याने जान फुंकली आहे. मॅक्सवेल हे वादळ आहे. मंगळवारी वानखेडेवर ते घोंघावलं. पण जशी वादळाची काही ठराविक वेळ नसते, किती वेळ राहील सांगता येत नाही तसंच मॅक्सवेलचं. या वादळाच्या तडाख्यात भारतीय संघ सापडू नये एवढंच…