चाहत्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी वर्ल्डकप सामन्यांदरम्यान लाईट शो सुरू केला जातो. खेळाडू ड्रिंक्स ब्रेकवर असताना मैदानात लाईट शो सुरू होतो. पण ४० चेंडूत वादळी शतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला मात्र ही कल्पना भावलेली नाही. सामन्यादरम्यान लाईट शो ही अतिशय भंगार आणि भयंकर कल्पना आहे अशा शब्दात मॅक्सवेलने टीका केली आहे. मॅक्सवेलने बुधवारी राजधानी दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावण्याची किमया केली. नेदरलँड्सच्या सगळ्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या मॅक्सवेलला दोन मिनिटांच्या लाईट शोने चांगलाच त्रास दिला.

‘मायदेशी ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेदरम्यान अशाच स्वरुपाचा लाईट शो आयोजित करण्यात आला होता. त्याने माझ्या डोक्यात कसंतरी होतं. लाईट शो नंतर प्रकाशाशी जुळवून घेण्याकरता थोडा वेळ जातो. क्रिकेटपटूंसाठी खेळता खेळता असा लाईट शो सहन करणं ही भीषण अशी संकल्पना आहे. त्यामुळेच लाईट शो सुरू झाली की मी डोळे मिटून घेतो आणि दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. पण हे भयंकर आहे. चाहत्यांसाठी कदाचित हे आनंददायी असेल पण आमच्यासाठी नक्कीच नाही’, असं मॅक्सवेलने सांगितलं.

अद्भुत खेळीबद्दल बोलताना मॅक्सवेल म्हणाला, ‘माझ्या घरचे भारतात आले आहेत. त्यामुळे माझी पुरेशी झोप झाली नव्हती. मला बॅटिंगला जायचंच नव्हतं. एरव्ही असं होत नाही. मैदानात जाऊन खेळण्यासाठी मी उत्सुक असतो पण काल नव्हतो. पण मी जसा खेळायला उतरलो मला छान वाटलं. वर्ल्डकपमध्ये माझी कामगिरी चांगली होत नव्हती. पण कालच्या खेळीमुळे हुरुप वाढला’.

मॅक्सवेलने ४४ चेंडूत ९चौकार आणि ८ षटकारांचा पाऊस पाडत १०६ धावा केल्या. वर्ल्डकप स्पर्धेतील वेगवान शतक आता मॅक्सवेलच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वीच एडन मारक्रमने दिल्लीच्याच मैदानात ४९ चेंडूत शतक केलं होतं. अवघ्या काही दिवसात मॅक्सवेलने मारक्रमचा विक्रम मोडला. मॅक्सवेल आणि वॉर्नरच्या शतकी खेळींच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३९९ धावांचा डोंगर रचला. या लक्ष्यापुढे नेदरलँड्सने शरणागती पत्करली. त्यांचा डाव ९० धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.